रोजगाराच्या दाव्याबाबत दिशाभूल - चव्हाण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

रोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक नसून, ते दिशाभूल करीत आहेत, फडणवीस यांनी विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मुंबई - रोजगारनिर्मितीबाबत केलेल्या दाव्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामाणिक नसून, ते दिशाभूल करीत आहेत, फडणवीस यांनी विभागनिहाय नेमके किती रोजगार निर्माण झाले, याची विस्तृत आकडेवारी जाहीर करावी, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

देशातील एकूण रोजगारनिर्मितीपैकी एकट्या महाराष्ट्रात २५ टक्के रोजगारनिर्मिती झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत केला आहे. या दाव्यावर चव्हाण यांनी टीका केली. रोजगाराच्या आकड्यांबाबत विपर्यास करून मुख्यमंत्री एकप्रकारे जनतेसोबत लबाडी करीत आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

अर्थक्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळींनी देशातील आर्थिक मंदी व बेरोजगारीवर चिंता व्यक्त केली असताना, मुख्यमंत्र्यांनी जणू राज्यात बेरोजगारीचे संकट नाहीच, असा अविर्भाव आणला आहे. निती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे राजीव कुमार यांनीही नोटाबंदी, जीएसटीमुळे देशातील १ कोटी १० लाख लोकांना बेरोजगार व्हावे लागल्याचे सांगितले आहे. भाजप सरकारच्या काळात बेरोजगारीने ४५ वर्षांतील उच्चांकी ६.१ टक्के स्तर गाठला आहे. संघटित क्षेत्रातील बेरोजगारीचा दर ८.२ टक्के, तर संघटित व असंघटित मिळून २० टक्‍क्‍यांवर गेला आहे. अशा विदारक परिस्थितीचा परिणाम न व्हायला महाराष्ट्र भारताबाहेर आहे की काय, असा संतप्त सवालही अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Employment Ashok Chavan