...एक तरी झाड लावावे! 

...एक तरी झाड लावावे! 

राष्ट्रीय महामार्गालगत 125 कोटी झाडे लावण्याचा निर्धार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकताच बोलून दाखवलाय. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यात 33 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतलाय. मात्र, अंमलबजावणी योग्य झाली तर ठिक नाहीतर घोषणा फक्त घोषणाच राहतील. फिलिपाइन्स सरकारने नुकतेच पदवीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने दहा झाडे लावलीच पाहिजेत, असा कायदा केला. भारतात अशी सक्ती वादाचा विषय ठरू शकते. मात्र, प्रत्येकाने जीवनात एक झाड लावले तरी भारताचे नंदनवन होईल अन्‌ वाढत्या तापमानाशी दोन हात करण्यास आपण सज्ज होऊ. 

पर्यावरणासाठी झटणारी "सृष्टी' 
नागपुरात सृष्टी पर्यावरण संस्थेची 2007 मध्ये स्थापना झाली ती पर्यावरण आणि वन, वन्यजीव संवर्धनाच्या उद्देशाने. संस्थेने नागपूर शहरासह विदर्भातील पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवडीत मोलाचा वाटा उचलल्याचे संस्थेचे अध्यक्ष संजय देशपांडे सांगतात. देशपांडे हे पर्यावरण, वन्यजीव संवर्धनासाठी झपाटलेले व्यक्तिमत्त्व. कायम वृक्षसंवर्धनासह विविध कामांचीच चर्चा करताना दिसतात. 2010 मध्ये अंबाझरी तलावाजवळील वडाचे झाड मृत्युशय्येकडे चालले होते. त्याला "सृष्टी'च्या पुढाकाराने वाचवले. त्यानंतर बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राण्यांसाठी सर्वप्रथम विदर्भात टॅंकरने पाणीपुरवठ्याचा प्रयोग यशस्विरीत्या राबवला. शहरातील वृक्षारोपण मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली. अंबाझरी राखीव वनक्षेत्रातील अवैध चराई बंदीसाठी परिसराला संरक्षित भिंत बांधण्यासाठी संस्थेने वन विभागाकडे पाठपुरावा केला. परिणामी, परिसराच्या संवर्धनाने गवताचे क्षेत्र वाढले. सहाजिकच तेथे पक्ष्यांचा अधिवास वाढला. आता मोरांचे थवेच्या थवे येथे दिसतात. हे यश वन विभागाच्या सहकार्यामुळे असले तरी "सृष्टी'चा पाठपुरावाही महत्त्वाचा आहे. 

देवराई-वनराईत हजारो वृक्ष 
नाशिक -
 हजारो वृक्षांची लागवड, त्यांच्या वाढदिवसासारखा उपक्रम नाशिकला "आपलं पर्यावरण' राबवते. वृक्षारोपण, नामशेष होऊ पाहणाऱ्या जंगली, वनौषधी व दुर्मिळ वृक्षांच्या लागवडीचा महोत्सवाचा अनोखा पायंडा रुजवणाऱ्या "आपलं पर्यावरण'चे शेखर गायकवाड यंदाही हजारो नाशिककरांसोबत जागतिक पर्यावरणदिनी दोन एकरांवर पाचशे जंगली झुडपांच्या लागवडीचा वन महोत्सव करणार आहेत. चार वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात संस्थेने 15 हजारांवर पर्यावरणप्रेमींच्या सहभागातून सातपूरला "नाशिक देवराई' फुलवली, एका दिवसात 11 हजार भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड केली. 2016 मध्ये म्हसरुळला "नाशिक वनराई'त 6 हजार रोपांच्या लागवडीद्वारे दुसरा वनमहोत्सव केला. 2017 मध्ये दोन वर्षांच्या 11 हजार वृक्षांचा वाढदिवसाचा उपक्रम हजारोंच्या उपस्थितीत राबवला. गेल्या वर्षी "नाशिक देवराईत' नामशेष होऊ पाहणाऱ्या विविध प्रजातींच्या हजार रानवेलींची तर यंदा पुन्हा दोन एकर जागेत 500 जंगली झुडपांचे रोपण होणार आहे. 

...झटताहेत कृतिशील वृक्षप्रेमी!  
सोलापूर -
 येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास यन्नम वृक्षारोपण आणि संवर्धनसाठी झटत आहेत. अतुल्यसेवा प्रतिष्ठानद्वारे श्रीनिवास व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलंय. दुभाजकातील रोपे जगवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. रस्त्यावरील झाडं तोडताना कोणी दिसले की ते काम बाजूला ठेवून चौकशी करतात. परवानगी शिवाय वृक्षतोड असल्यास महापालिका वृक्ष प्राधिकरणाकडे तक्रार करतात. अधिकारी, कर्मचाऱ्यांना झाडं तोडणाऱ्यांवर कारवाईस भाग पाडतात. जुळ्या सोलापुरातील रहिवासी, पर्यावरणप्रेमी पंकज चिंदरकर यांनी झाडं वाचवण्यासाठी अनेकदा स्वत:चा जीव धोक्‍यात घातलाय. 

"येरळा'च्या वतीने "घरोघरी देवराई' 
सांगली - येरळा प्रोजेक्‍ट सोसायटीच्या वतीने जत तालुक्‍यातील जालीहाळ परिसरातील 42 गावांमध्ये गेल्या वर्षीपासून "घरोघरी देवराई' मोहिमेस प्रारंभ झाला. पुढील पाच वर्षांत पर्यावरणपूरक व फळांची अशी दहा लाख झाडे पाच हजार एकरांवर लावण्यात येतील. गतवर्षी पथदर्शी प्रकल्पांतर्गत 110 एकरांवर एकरी 200 याप्रमाणे झाडे लावण्यात आली. यावर्षी एक हजार एकरांवर झाडे लावली जातील. याबाबत संस्थेचे सचिव नारायण देशपांडे म्हणाले, ""प्रत्येकाचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य स्वास्थ्य, राहणीमान उंचावणे "येरळा'चे ध्येय आहे. "घरोघरी देवराई' हा त्याचाच भाग आहे. प्रत्येक कुटुंबाच्या एक एकर क्षेत्रावर 200 उपयुक्त झाडे लावली जातील. याशिवाय, अवनी योजनेंतर्गत ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्यांच्या अंगणात 11 हापूस आणि केशर आंब्याची रोपे लावण्यात येतील. दरवर्षी सुमारे 42 गावांतील मुलींच्या जन्माचे स्वागत असे होईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com