#स्पर्धापरीक्षा - 'ब्रेक्झिट'

टीम ई सकाळ
शुक्रवार, 26 मे 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर 
ब्रिटनने युरोपीय महासंघात राहावे अथवा त्यातून बाहेर पडावे, यासाठी ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमताचा कौल दि. 24 जून 2016 रोजी ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडावे, या बाजूने लागला. दि. 23 जून 2016 रोजी या मुद्यावर ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात आले आणि त्यातून आलेल्या निकालानंतर ब्रिटन यापुढे युरोपीय संघात नसणार, या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. हा ऐतिहासिक निकाल 'ब्रेक्झिट' (Brexit) या नावाने ओळखला जातो. 'ब्रिटन' आणि 'एक्‍झिट' या दोन शब्दांचा मिळून बनलेला शब्द म्हणजे 'ब्रेक्झिट' होय. त्याचा अर्थ 'ब्रिटनची युरोपियन महासंघातील 'इक्‍झिट' असा होतो. 

सार्वमत चाचणीमध्ये ब्रिटनमधील 72.2 टक्के जनतेने मतदान केले. झालेल्या एकूण मतदानाच्या 51.9 टक्के लोकांनी ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडावे, या बाजूने मतदान केले तर उर्वरित 48.1 टक्के लोकांनी ब्रिटनने महासंघात कायम राहावे, हे मतदानाद्वारे सांगितले. सार्वमत चाचणीच्या निकालानंतर ब्रिटनने युरोपियन महासंघात कायम राहावे, या मताचे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून (David Cameron) यांनी राजीनामा दिला. 

बाहेर पडण्याच्या समर्थनार्थ दिली गेलेली कारणे 

 • ब्रिटनच्या सार्वभौमत्वाला युरोपियन महासंघाकडून धक्का
 • मुक्त धोरणांतर्गत युरोपीय देशांमधील अनेकजण ब्रिटनमध्ये स्थलांतरित, त्यामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर ताण
 • मोठ्या प्रमाणात दहशतवाद फोफावत असताना हे धोरण धक्कादायक
 • महासंघाचे निर्बंध संपुष्टात आल्यास ब्रिटनमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतील, बेरोजगारांची संख्या कमी होऊन हा प्रश्‍न सुटू शकेल. 
 • व्यापारासाठी ब्रिटनला महासंघाची गरज नाही, तर महासंघालाच ब्रिटनची गरज आहे, असा मतप्रवाह. लंडन पूर्वीपासूनच जागतिक सत्तेचे केंद्र असल्याने ब्रिटनला महासंघाच्या टेकूची गरज नाही, असा बाहेर पडण्याच्या बाजूने असणाऱ्या वर्गाचा विचार. 

कायम राहण्याच्या बाजूने सांगितली जाणारी कारणे 

 • ब्रिटन बाहेर पडल्यास महासंघाशी संबंधित तीस लाख नोकऱ्यांवर गदा येईल, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न सुटणार तर नाहीच उलट तो अधिक चिघळत जाऊन जोमाने डोके वर काढेल. 
 • संपूर्ण युरोपची बाजारपेठ हातातून जाईल. 
 • महासंघात कायम राहिल्यासच लंडनचे युरोपातील सर्वाधिक महत्त्व कायम राहील. 
 • अनेक कायदे महासंघाशी संबंधित असल्याने महासंघातून बाहेर पडल्यास गोंधळाची शक्‍यता 

महासंघातून बाहेर पडलेले देश 

 • युरोपियन महासंघाच्या करारानुसार कलम 50 अन्वये सदस्य राष्ट्रांना महासंघातून बाहेर पडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. 
 • स्वातंत्र्यापूर्वी फ्रान्सचा भाग असणाऱ्या अल्जेरिया (Algeria) या राष्ट्राने स्वातंत्र्यानंतर इ. स. 1962 मध्ये युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 
 • 1985 मध्ये डेन्मार्कचा स्वायत्त भाग असणाऱ्या 'ग्रीनलॅण्ड' (Greenland) ने महासंघाचे सदस्यत्व सोडले. 
 • अल्जेरिया आणि ग्रीनलॅण्डनंतर युरोपियन महासंघातून बाहेर पडणारे ब्रिटन हे तिसरे राष्ट्र ठरले आहे. युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासंबंधी ब्रिटनने यापूर्वी 1975मध्येही सार्वमत घेतले होते; पण त्या वेळचा कौल महासंघात कायम राहण्याच्या बाजूने मिळाला. 
 • स्वतंत्र देश या निकषाखाली जर विचार केला तर महासंघातून बाहेर पडणारे ब्रिटन हे पहिलेच राष्ट्र ठरले आहे. 

ब्रेक्झिटचे परिणाम 

 • ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडू नये, अशा मताचे आणि त्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा. टेरेसा मे (Theresa May) या ब्रिटनच्या नवीन 'ब्रेक्झिट समर्थक' पंतप्रधान. 
 • भारतासह जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळले. युरोपातील तसेच आशियातील प्रमुख शेअर बाजारांच्या निर्देशांकात 8 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण 
 • इतर देशांच्या तुलनेत ब्रिटिश पौंडाचे मूल्य घटले. ही मूल्यघसरण 1985 नंतरच्या सर्वात नीचांकी पातळीवर. 
 • कच्च्या तेलाच्या भावात घसरण, भाव पुन्हा 47 डॉलरवर 
 • सोने-चांदीच्या किमतीत मात्र जोरदार तेजी. दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये अनुक्रमे 10 ग्रॅम आणि 1 किलोमागे सुमारे 1,500 रुपयांनी वाढ. 
 • 'ब्रेक्‍झिट'मुळे आता महासंघातील इतर देशही ब्रिटनचे अनुकरण करून महासंघातून बाहेर पडण्याची शक्‍यता वाढली. 
 • आर्थिक मंदीची स्थिती आणखी तीव्र होण्याची भीती तसेच जागतिकीकरण आणि उदारमतवादापासून दूर जाऊन आपापल्या देशाचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढण्याची शक्‍यता 
 • लंडनमधील अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्‍यता 
 • फुटबॉलमधील 'इंग्लिश प्रीमियर लीग' ही स्पर्धा जगभरातील सर्वोच्च फुटबॉल स्पर्धा समजली जाते. ती इंग्लंडमध्ये खेळली जाते; परंतु आता ब्रेक्‍झिटमुळे फुटबॉलपटूंच्या ब्रिटनमधील मुक्त संचारावर मर्यादा येतील. त्यांना 'वर्क परमिट' मिळविण्यासाठी विविध निकष लावावे लागतील. 
Web Title: esakal competitive exam series upsc mpsc Brexit