गरीब मराठ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!

प्रकाश पाटील
रविवार, 13 ऑगस्ट 2017

मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने गरीब मराठे कधी नव्हे ते एकवटले. पुढाऱ्यांना त्यांनी शेवटी ठेवले. आम्ही मूक आहोत; पण आमच्या मनात असंतोष खदखदत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. मराठा क्रांती मोर्चा हे नेतृत्व करण्याचे ठिकाण नाही. जर मराठा नेत्यांना समाजाविषयी इतका कळवळा असेल तर सरकार दरबारी प्रयत्न करावेत. नेतृत्व त्यांच्या पक्षात करावे. मराठा समाज कोणा एका मालकीचा होऊ नये. 

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा अभूतपूर्वच होता. राज्याच्या राजधानीत मराठा समाजाने जी एकजूट दाखविली त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. समाजाच्या ज्या म्हणून काही प्रमुख मागण्या आहेत, त्यापैकी काही मागण्या या पूर्ण झाल्याचे दिसून येते. मराठा क्रांती मोर्चाचे आजपर्यंत 57 मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांसाठी जी काही आचारसंहिता मोर्चेकरांनी आखून दिली होती. त्या आचारसंहितेचे मुंबईच्या मोर्चात उल्लंघन झाले का ? आजपर्यंत समाजाचा मूक संताप दिसून आला होता. मात्र, या मोर्चात मनातील खदखद उफाळून आली का ? मूक बनलेला आवाज बुलंद गर्जनांनी दुमदुमला का ? की मोह आवरता आला नाही. आजपर्यंत प्रत्येक मोर्चात सर्वच पुढाऱ्यांना मोर्चाच्या शेवटी स्थान होते. या मोर्चात तसे दिसले का ? मुंबईतील मोर्चा कोणी हायजॅक केला ? मराठा मोर्चाचे कोणी मालक होऊ पाहात आहे का ? याचे उत्तर मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक देऊ शकतील का ? 

राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने सामाजिक व राजकीय वातावरण गेल्या वर्षभरात ढवळून निघाले. मराठ्यांचा रोष, आवेश व जोश याची ताकद आतापर्यंत दिसली तोच जोश मुंबईतील मोर्चातही होता. शिक्षण व नोकरीतले आरक्षण, शेतमालाला भाव या कळीच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी मराठे पुन्हा एकदा एकवटले. 

सरसकट सर्व मागण्या पूर्ण करून घेता आलेल्या नसल्या तरी शिक्षण व शेतीच्या बाबतीत काहीतरी संधी मिळण्याची खात्री सरकारच्या आश्‍वासनामुळे मराठा समाजाला मिळाली आहे. तसेच मराठा समाजातील मुला-मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यावर सरकारचा भर आहे. आत्महत्या केलेल्या राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. दहा लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. फडणवीस सरकार मराठा समाजासाठी ज्या म्हणून काही योजना आणत आहे, त्या योजना गरजू शेतकरी आणि मुला-मुलींना मिळाल्या पाहिजेत. या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील याची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर दुसरेच फायदा घेऊन मोकळे होतील. वंचित मराठ्यांपर्यंत या योजनांचा कोणत्याही परिस्थितीत फायदा झाला पाहिजे; अन्यथा मनातील खदखद केव्हा उफाळून येईल हे सांगता येणार नाही. त्यासाठी नेत्यांचीही कोणी वाट पाहणार नाही. 

समाजात आजही दोन टोकं आहेत. एक हालअपेष्टात जगणारा मराठा आणि दुसरीकडे श्रीमंत मराठा. आजपर्यंत मराठा समाजाचा उपयोग "व्होट बॅंक' म्हणूनच बड्या नेत्यांनी करून घेतला. मात्र, गरीब मराठ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट श्रीमंत मराठे अधिक श्रीमंत आणि गब्बर बनले. धनदौलत, संपत्तीच्या जोरावर आपली घराणी जपण्याचेच काम केले गेले. काही अपवाद सोडला तर कधीही श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला नाही. आपला मुलगा, मुलगी, भाऊ, सून यांचेच करिअर घडविण्याचा प्रयत्न केला. गरीब मराठे मात्र त्यांच्या मागे धावत राहिले. ज्यावेळी गरीब मराठ्यांना आपल्या हक्काची जाणीव होऊ लागली तेव्हा मात्र या प्रस्थापितांविरोधात आवाज बुलंद होऊ लागला. आज मराठ्यांची जी म्हणून काही घराणी आहेत, त्यांना आव्हान देण्याचे काम सामान्य मराठे करीत आहेत. 

मुंबईतील मराठा मोर्चाला सकाळी भायखळ्यापासून सुरवात झाल्यानंतर काहीवेळातच मुंबई भाजपचे अध्यक्ष तेथे पोचले. मात्र, मोर्चेकऱ्यांनी त्यांना रोखले. त्यांची चमकोगिरी खुद्द मोर्चेकरांनाही आवडली नाही. त्यांना भायखळ्यात जाऊन मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. हा एपिसोड सकाळी झाला. मात्र, सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला काय दिले, याची माहिती मोर्चातील मुली देत होत्या. त्याचवेळी संभाजीराजेंबरोबर आमदार नीतेश राणे हेही व्यासपीठावर आले आणि त्यांनी भाषणबाजी सुरू केली. मराठा मोर्चेकऱ्यांनी गेल्या 57 मोर्चात जी आचारसंहिता पाळली त्याचे काय झाले. एकाच पक्षाचा नेता व्यासपीठावर कसा गेला ? या प्रश्‍नाचे उत्तर मोर्चेकरांना द्यावे लागेल. शेवटी जे व्हायचे ते पुढे झालेच. नीतेश राणेंचे मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर जाणे काही जणांना खटकले आणि ते खाली येताच त्यांना घेराओ घालून जाबही विचारला. 

मराठा समाज हा कोणाच्या मालकीचा नाही. आजपर्यंत मोर्चात सर्वच पक्षाचे नेते आणि महानेते पक्षभेद विसरून सहभागी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. समाजातील गरीब मराठ्यांच्या मागण्या तडीस लावण्यासाठी सर्वजण मतभेद विसरून मोर्चाला पाठिंबा देत आले. समाजातील तरुण मुला-मुलींनी टेक्‍नॉलॉजी, सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून आंदोलन प्रभावी केले. कम्युनिकेशन प्रभावी केले. समाजाला खडबडून जागे केले. प्रत्येकाला रस्त्यावर आणण्याचे काम समाजातील पोरांनीच केले असे म्हणावे लागेल. 

मराठा क्रांती मोर्चाच्या रूपाने गरीब मराठे कधी नव्हे ते एकवटले. पुढाऱ्यांना त्यांनी शेवटी ठेवले. आम्ही मूक आहोत; पण असंतोष खदखदत आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. आजपर्यंत जे जपले तेच पुढे चालले पाहिजे. मराठा क्रांती मोर्चा हे नेतृत्व करण्याचे ठिकाण नाही. जर मराठा नेत्यांना समाजाविषयी इतका कळवळा असेल तर सरकार दरबारी प्रयत्न करावेत. आजही सर्व पक्षात 148 आमदार आहेत. इतकी मोठी शक्ती असताना समाजासाठी ते काय करतात ? हा प्रश्‍न उरतोच. त्यामुळे मराठा समाज कोणा एका मालकीचा तर होऊच नये, शिवाय गरीब मराठ्यांना न्याय कसा मिळेल, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

Web Title: Esakal sakal news prakash patil writes about maratha morcha