esakal | आता प्रतीक्षा पावसाची…
sakal

बोलून बातमी शोधा

farmer waiting for rain

आता प्रतीक्षा पावसाची…

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मॉन्सूनच्या आगमनानंतरही अद्याप राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर शहर आणि परिसरातही सध्या अशीच स्थिती कायम आहे. मात्र कोकणातील काही ठिकाणी मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. तर गुरुवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत रत्नागिरी येथे जोरदार पावसाची नोंद झाली.

मागील आठवड्यात देशाच्या दोन्ही किनारी भागांत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे व बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी वायव्य भारतात प्रवेश करण्यास सुरुवात केली. हे होत असताना मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला आणि या पोषक वातावरणाच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस पडला.

हेही वाचा: ‘फिरस्त्या’ची प्रदर्शनापूर्वीच ५४ पुरस्कारांची कमाई

राज्यात गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक भागात मुसळधार पावसाची नोंद झाली होती. जुलैचे दोन आठवडे उलटून गेले असून, अद्याप पावसाने संपूर्ण राज्यात म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंताही काहीशी वाढली आहे. तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्यातील तुरळक भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या पूर्व विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून येत्या १९ जुलैपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचा: कुठे अन् कसा पाहाल दहावीचा निकाल

शहर व परिसरात गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती. तर दिवसभर ऊन सावलीचा खेळ सुरूच होता. पुण्यात पावसाने काहीशी उघडीप घेतल्याचे चित्र आहे. अद्याप पावसाने अपेक्षित जोर धरला नाही. त्यामुळे सर्वांना पावसाच्या जोरदार सरींची प्रतीक्षा आहे. तर गुरुवारी हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात पुढील सहा दिवस म्हणजेच येत्या बुधवारपर्यंत (ता. २१) आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

loading image