‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला - अजित पवार

Ajit-Pawar
Ajit-Pawar

मुंबई - मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन झालेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कदापि बंद होणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज या संस्थेची स्वायत्तता कायम ठेवली आणि तिला तातडीने आठ कोटींचा निधी देऊ केला आहे. ‘सारथी’च्या विकासासाठी सर्वस्व पणाला लावण्याची आपली तयारी असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

समाजबांधवांच्या शाश्वत विकासासाठी ‘सारथी’कडून ‘व्हिजन २०२०-३०’ हा दहा वर्षाचा आराखडा तयार केला जाईल. ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या आर्थिक, प्रशासकीय अडचणी दूर होण्यासाठी दोन्ही संस्था पुढच्या काळात नियोजन विभागांतर्गत काम करतील, अशा अनेक महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी आज केल्या. 

मान्यवरांची उपस्थिती
‘सारथी’ संस्थेसमोरील प्रश्नांचा आढावा घेऊन ते सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला इतर मागासवर्गीय विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, खासदार  संभाजीराजे छत्रपती, आमदार विनायक मेटे आदींसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत संभाजीराजे आणि मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी विचार मांडले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
मान्यवरांच्या मतांची दखल
या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संभाजीराजे  छत्रपती यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले की, ‘सारथी’ संस्थेसंदर्भात विविध व्यक्ती, संस्था, मान्यवरांकडून आलेली निवेदने, पत्रे, मागण्यांची नोंद घेण्यात आली आहे, त्यांचा एकत्रित विचार करून सर्वांच्या मनासारखा सकारात्मक निर्णय व्हावा, ही सरकारची भूमिका आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजाच्या विविध विद्याशाखा, अभ्यासक्रमात शिकणाऱ्या, स्पर्धापरिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क त्वरित मिळावे यासाठी उद्याच ८ कोटी रुपये ‘सारथी’ला उपलब्ध करून दिले जातील.’’  

पवारांनी मानले आभार
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उपमुख्यमंत्र्यांनी स्वत:हून पुढाकार घेऊन बैठक आयोजित केल्याबद्दल तसेच या दोन्ही संस्थांची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही  संभाजीराजेंनी निमंत्रणाचा स्वीकार करून बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

अजितदादांची  थेट कार्यवाही 
‘सारथी’ संस्थेला ८ कोटी रुपयांचा निधी देत असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन तासांतच हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून तसे पत्र ‘सारथी’ ला पाठविण्यात आले आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले . त्यामुळे पवारांची निर्णयक्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी ११ वाजता मंत्रालयातील त्यांच्या दालनात खासदार  संभाजीराजे छत्रपती व मराठा समाज प्रतिनिधींची बैठक घेतली. दुपारी दीड वाजता पत्रकार परिषदेत ८ कोटी देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अवघ्या दोन तासात म्हणजे साडेतीन वाजण्याच्या सुमारास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने  सुमारे ७ कोटी ९४ लाख ८९ हजार २३८ रुपये इतका निधी ‘सारथी’ला देण्यात आला.

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने सुरु झालेल्या संस्थेचा कारभार राजर्षींच्या नावाला साजेशा पद्धतीनं, त्यांचा गौरव वाढवणारा असेल याची काळजी घेऊ. ‘सारथी’चा गौरव वाढवण्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी आहे.  ‘सारथी’ची नाहक बदनामी करण्याचे प्रकार थांबवावेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

दोन तासांत आठ कोटी रुपयांचा निधी मिळवता आला. सर्व मागण्या मान्य करून घेता आल्या. ही समाजाची ताकद आहे. हा मराठा समाजाचा विजय आहे. समाजात एकी असली की सर्व काही करून घेता येते. स्वायत्त आणि सक्षम सारथी गरीब मराठा समाजातील गुणवंत युवकांच्या जीवनात क्रांती घडवेल.
- संभाजीराजे छत्रपती, खासदार

अन्य निर्णय

  • ‘तारादूत’ यांना दोन महिन्यांचा प्रलंबित निधी  
  • ‘सारथी’, ‘अण्णासाहेब पाटील महामंडळ’ नियोजन विभागाअंतर्गत काम करणार
  • दोन्ही संस्थांची जबाबदारी अजित पवारांकडे
  • संस्थेकडून होणाऱ्या खर्चाची माहिती दरमहा संकेतस्थळावर 
  • नव्या कल्पनांनुसार पुढील दिशा ठरणार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com