
Vilasrao Deshmukh : तेव्हा विलासरावांनी अमेरिकेतून रात्री अडीच वाजता फोन करून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. राजकारणातले राजहंस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या आठवणी आजही सामान्य माणसांपासून ते मोठमोठ्या नेत्यांपर्यंत अनेकांच्या मनात कायम आहेत. त्यांचे किस्सेही सतत चर्चेत असतात.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी असाच एक किस्सा शेअर केला आहे. विलासराव देशमुखांनी तेव्हा रात्री अडीच वाजता अमेरिकेतून फोन करून शेतकऱ्यांचं आंदोलन सोडवलं होतं.
राजू शेट्टी म्हणाले, "सरकारचे नाक दाबल्याशिवास तोंड उघडत नाही. त्यामुळे आंदोलने करावी लागतात. राजकीय नेत्यांनी मुंबई फार प्यारी असते. त्यामुळे दूध दराचा प्रश्न आल्यावर मी मुंबईचे दूध तोडायचे ठरवले. चार दिवस मुंबईत दूध येऊ दिले नाही. मुंबईतील लोकांइतकेच राजकीय नेतेही अस्वस्थ झाले."
"विलासराव देशमुख त्यावेळी अमेरिका दौऱ्यावर होते. त्यांनी तेथून रात्री अडीचला मला फोन केला. आंदोलन मागे घ्या, दोन दिवसांत आर. आर. पाटील तुमच्यासोबत बैठक घेतील आणि दूध दरवाढ होईल, अशी ग्वाही दिली.पण इतक्या सहजासहजी शेतकऱ्यांना काही मिळत नाही. त्यावेळीही तसेच झाले. विधानसभेत आवाज उठवावा लागला. दोन दिवस विधानसभा बंद पाडली. मग कुठे दोन रुपयांची दरवाढ मिळाली", असंही राजू शेट्टी पुढे म्हणाले.