विशेष मुलाखत : आई- वडिलांनीच सेन्सॉर बोर्ड व्हावे : आशा पारेख

Exclusive Interview of veteran actress asha parekh takes by Arun Surve
Exclusive Interview of veteran actress asha parekh takes by Arun Surve

प्रश्न : तुमच्या काळात चित्रपटसंगीत हा चित्रपटांचा आत्मा असायचा. मात्र सध्याचे चित्रपट पाहताना हा आत्मा हरवल्यासारखं वाटतयं का?
उत्तर :
नक्कीच. आमच्या काळातील चित्रपटांमध्ये गाणी ही श्रवणीय असत आणि चित्रपटाच्या कथेबरोबरच गाण्यांनाही महत्त्वाचं स्थान असे. गीतांचा आशय व अर्थांमुळे आजही ही गाणी लोकप्रिय आहेत. मात्र बदलत्या काळानुसार गाणीही बदलत गेली. पहिल्यासारखं सुरेल संगीत आता राहिलं नाही. वाद्यांच्या गदारोळात ही गाणी हरवून जातात. काही चित्रपटांमध्ये चांगली गाणी येतात. पण काही दिवसांतच ती विसरली जातात.

प्रश्न : देवानंद, धमेंद्र, सुनील दत्त, शम्मी कपूर यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर तुम्ही काम केलं आहे. यातील कोणाबरोबर काम करताना तुमच्यातील अभिनयाचा कस लागायचा?
उत्तर :
खरं तर मी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर अभिनय केला. प्रत्येकाचा स्वभाव अन्‌ वैशिष्ट्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे होती. पण सर्वांबरोबर काम करताना मजा आली. आम्ही सर्व जण एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. आमच्या सर्वांची मनं एक झालेली होती. आता मात्र एक दृश्‍य झालं, की कलाकार व्हॅनमध्ये जातात. त्यामुळे त्यांचे इतरांशी फारसं सख्य नसल्याचे दिसून येतं. त्याचाही चित्रपटांच्या निर्मितीवर कळत- नकळत परिणाम घडत असतो.

प्रश्न : "आंदोलन' हा 1995 मध्ये तुमचा आलेला शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर गेल्या पंचवीस वर्षांत तुम्ही चित्रपटांपासून दूर राहिलात, त्यामागं काय कारणं आहेत?
उत्तर : 
विशिष्ट काळानंतर अभिनय क्षेत्रातून मी बाजूला व्हायचं ठरवलं होतं. त्यानुसार मी कृती केली. मात्र चित्रपटसृष्टीपासून दूर गेली नाही. मी आकृती नावाची प्रॉडक्‍शन कंपनी काढली होती. त्या माध्यमातून निर्मितीतही उतरले होते. त्याचबरोबर "ज्योती' या गुजराथी मालिकेच्या माध्यमातून दिग्दर्शनातही उतरले होते. विशेष म्हणजे ज्योती ही मालिका खूपच हीट झाली. आपणही दिग्दर्शन चांगल्याप्रकारे करू शकतो, असा विश्‍वास माझ्यात निर्माण झाला. त्याचबरोबर "बाजे पायल', "कोरा कागज', "कंगन' या शोंसह दोन छोट्या फिल्मसही केल्या.

प्रश्न : सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा म्हणून तुम्ही काम पाहिलं आहे? खरंच अशा बोर्डाची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर : 
सेन्सॉर बोर्डाची अध्यक्षा असताना मला खूप काही शिकायला मिळालं. त्याचप्रमाणे मला जेवढं काही करता येईल, तेवढं योगदानही मी दिलं. मात्र सध्या इंटरनेट, यू-ट्यूब आणि सोशल मीडियामुळे त्याला महत्त्व राहिलं नाही. आता आई-बाबांनीच सेन्सॉर बोर्ड व्हायला हवे, असे माझं मत आहे. कारण आपली मुलं मोबाईल व सोशल मीडियावर काय पाहतात अन्‌ काय नाही, याकडे लक्ष द्यायला हवं. नाहीतर मुलं वाईट गोष्टी पाहून त्यातून उद्याची पिढी बरबाद होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

प्रश्न : "चिराग' या चित्रपटात तुम्ही अंध मुलीची भूमिका साकारली? या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. ही भूमिका निभावण्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न केलेत का?
उत्तर : 
राज खोसला यांनी दिग्दर्शित केलेला "चिराग' हा चित्रपट 1969 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात मी अंध मुलीची भूमिका साकारली आहे. ही भूमिका अस्सल वाटण्यासाठी मी अंधशाळेमध्ये जाऊन राहिले होते. तेथील मुलांचे अनुभव ऐकले अन्‌ त्यांच्याकडून बरंच काही शिकले. सुनील दत्त हे त्या चित्रपटाचे नायक होते. त्यांनीदेखील चांगले सहकार्य केले. विशेष म्हणजे माझ्या या भूमिकेचं खूपच कौतुक झालं होतं. हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.

प्रश्न : नृत्याची तुम्हाला खूप आवड आहे. त्यातूनच तुम्ही नृत्य ऍकॅडमीचीही स्थापना केली होती. सध्याच्या नृत्याकडं तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता?
उत्तर : 
नृत्याची जोपासना करण्यासाठी मी नृत्य ऍकॅडमीची स्थापना केली होती. ती काही दिवस सुरूही होती. मात्र निर्माते, दिग्दर्शकांचे निधन झाल्यामुळे तसेच कलाकारही वृद्ध झाल्याने ती बंद करण्यात आली. आता नृत्याक्षेत्रामध्ये खूपच बदल होत आहेत. मात्र आपल्या देशात अनेक ठिकाणी बाहेरील देशांमधील नृत्याचा स्वीकार करतात. त्यामुळे आपलं पारंपरिक नृत्य दुरावलं जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आपणच आपली संस्कृती जपण्यासाठी पुढाकार घेतला पाहिले.

प्रश्न : पुण्याविषयी तुमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. त्यामागे काय कारणे आहेत?
उत्तर : 
खरंतर पुणे हे माझं दुसरं घरचं आहे. कारण पुणे हे शहर मला लहानपणापासून आवडते. येथे आपलंही घर असावं, असं मला वाटतं होतं. त्या वेळी पुण्यामध्ये खूप छोटी-छोटी घरं होती. पण आता पुणे खूप बदललं आहे. मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. पण पुणेकरांनी संस्कृतीची जोपासना केली, याचा मला मनापासून अभिमान वाटतो. पुणेकरांनीही मला भरभरून प्रेम दिले. त्यामुळे 26 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये पुणेकर रसिकांना भेटायला येणार आहे. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. तसेच माझी गाणीही ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

प्रश्न : सध्याची पिढी खूप टेक्‍नोसॅव्ही आहे. तसेच सातत्याने बदल स्वीकारणारी आहे. या पिढीविषयी तुमच्या काय भावना आहेत?
उत्तर : 
सध्याची पिढी खूप बदल स्वीकारणारी आहे. बदलत्या काळानुसार ते योग्यही आहे. मात्र नातेसंबंधाबाबत नको ते बदल काही जण स्वीकारत आहे. ही बाब मला खटकते. आई-वडील हे आपले दैवत असल्याचे भान नवीन पिढीमधील अनेक तरुणांना राहिले नाही. अनेक जण त्यांना वृद्धाश्रमात टाकतात. अशीच घटना पुण्यामध्ये घडल्याचं ऐकलं. चार मुलांनी आईला मारहाण केली अन्‌ वृद्धाश्रमात टाकले. ज्या वेळी ही घटना उघड झाली, त्या वेळी ते आईला नेण्यासाठी आले. पण आईने स्वाभिमान सोडला नाही. ती त्यांच्याबरोबर गेली नाही. ज्या वेळी वृद्धाश्रम बंद होतील, त्या वेळी देशामध्ये खऱ्या अर्थाने नात्यांमध्येही ओलावा अन्‌ प्रेम आहे, हे सिद्ध होईल.

मुलाखत : अरुण सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com