साखरनिर्मितीचा खर्च वाढला; प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा - शरद पवार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे - जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता तयार झालेल्या स्थितीत राज्यातील साखरनिर्मितीचा खर्च वाढला आहे. यामुळे कारखान्यांना यंदा प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा येईल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले. 

पुणे - जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता तयार झालेल्या स्थितीत राज्यातील साखरनिर्मितीचा खर्च वाढला आहे. यामुळे कारखान्यांना यंदा प्रतिक्विंटल ४०० रुपये तोटा येईल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले. 

जगाच्या साखर बाजारपेठेचा अभ्यासपूर्ण आढावा घेत देशाबरोबरच राज्याच्या साखर कारखानदारीचे नेमके चित्र श्री. पवार यांनी व्हीएसआयच्या वार्षिक सभेत मांडले. श्री. पवार म्हणाले, की २०१७-१८ मध्ये जागतिक साखर उत्पादन १९३ दशलक्ष टन तयार झाले. त्यापैकी १८३ दशलक्ष टन साखरेचा वापर झाला आणि १० दशलक्ष टन साखर अतिरिक्त दिसते आहे. मात्र, २०१८-१९ च्या हंगामात जगात १९२ दशलक्ष टन तयार होईल. त्यातील १८५ दशलक्ष टन वापर होईल. म्हणजेच ७ दशलक्ष टन जगात जादा साखर तयार होणार आहे. 

भारतात २०१७-१८ मध्ये ३२२ लाख टन साखर तयार झाली. त्यातील २५६ लाख टन साखरेची विक्री बघता १६० लाख टन शिल्लक राहिली. देशात यंदा ३१५ लाख टन तयार होईल असे देशाचे अन्नमंत्री म्हणतात. त्यामुळे अधिक साखर उत्पादनाचा परिणाम बाजारपेठेवर होईल. त्यामुळे साखरदर घसरलेले आहेत. साखरेचा भाव प्रतिक्विंटल २९०० आहे. मात्र, नजीकच्या काळात बाजारपेठेत सुधारणा होणार नाही. यंदा कारखान्यांना ३३०० उत्पादन खर्च येणार असून, तोटा प्रतिक्विंटल ४०० रुपये होईल, असे सांगून श्री. पवार म्हणाले, की कारखान्यांना त्यामुळेच एफआरपी देणे अवघड जात आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी बघण्यास मिळते. त्यामुळे या समस्येतून बाहेर निघण्यासाठी आता सरकारी मदत झाली पाहिजे. 

केंद्राने साखर निर्यात वाहतूक अनुदान दिले; पण एफआरपी देण्यासाठी उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब सरकारप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेदेखील मदत केली पाहिजे. कारण साखर उद्योग हा राज्याच्या ग्रामीण भागाला, शेतीला मदत करणारा धंदा आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत वाढविणारा हा व्यवसाय सांभाळण्यासाठी सरकारने मदत करायला हवी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. 

आधुनिकीकरणाच्या कामाला लागा 
ऊस रसापासून बी हेव्ही मोलॅसिस तयार करणे, तसेच इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र घोषित केलेल्या आर्थिक मदतीच्या भूमिकेबद्दल मी अभिनंदन करतो. कारखान्यांच्या प्रकल्प आधुनिकीकरणासाठी ६१३९ कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाने जुन्या प्रकल्पांचे आधुनिककरण हाती घ्यावे. प्रकल्प नसल्यास उभारावा व केंद्राच्या तरतुदीतील वाटा पदरात पाडून दोन पैसे शेतकऱ्यांना जादा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला श्री. पवार यांनी दिला. 

शरद पवारांकडून साखर कारखान्यांना टिप्स 
- ऊस उत्पादनवाढीसाठी ऊस विकास विभाग सक्षम करा 
- तीन वर्षांत बेणे बदलासाठी प्रयत्न व्हावेत 
- इथेनॉलसाठी प्रकल्पांचे आधुनिकीकरण करावे 
- हुमणी नियंत्रणासाठी वेळीच पावले टाकावीत 
- भविष्यात शर्कराकंदाचा वापर, त्यासाठी गव्हाणीत बदल 
- ऊस उत्पादनवाढीच्या स्पर्धेत सहभाग वाढवावा 
- खोडवा उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे 
- ऊस पिकाची गुणवत्ता, उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न 

Web Title: Expenditure on sugar production increased says sharad pawar