‘द्रुतगती’वर आठपदरीकरण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

बोरघाटाला पर्यायी मार्ग
या प्रकल्पामुळे बोरघाटातील ६ किलोमीटर वळणाच्या मार्गाला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. लोणावळ्यापासून सुरू होणारा हा बोगदा पुढे खोपोली एक्‍झिट इथे संपणार आहे. मागील दीड महिन्यापूर्वी या कामास सुरुवात झाली असून, पुढील तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्याची मर्यादा शासनाने घातली आहे, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून हाती घेण्यात आलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्‍झिट या भागात दोन बोगदे व दोन व्हाया डक्‍टसह आठपदरी नवीन रस्ता बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे बोगदे सुमारे १० किलोमीटर लांबीचे आणि आठपदरी असून, आतापर्यंत १८०० फूट खोदकाम झाले आहे. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई अंतर सहा किलोमीटरने कमी होणार असून, २५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉर देखभाल दुरुस्तीसाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर ३० वर्षांच्या कालावधीसाठी शासनाने १९९९ पासून महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडे हस्तांतरित केले आहेत. 

द्रुतगती मार्ग व महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्‍झिट येथे वेगळे होतात. अडोशी बोगदा ते खंडाळा एक्‍झिट ही रुंदी सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त असून, दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार घडतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन पावसाळ्यत बंद ठेवावी लागते. 

या पार्श्‍वभूमीवर द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्‍झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटरच्या राहिलेल्या मिसिंग लिंकमुळे मुंबईला लवकर पोचणे शक्‍य होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: express way eight line