
शिवसेनेच्या आठ मंत्र्यांची हकालपट्टी? तीन कॅबिनेट तर पाच राज्यमंत्री
सोलापूर : महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केली. शिवसेनेचे ४१ आणि चार-पाच अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. राज्याच्या जनतेचे अनेक प्रश्न असतानाही राज्याच्या मंत्रिमंडळातील तथा शिवसेनेचे तब्बल आठ मंत्री मागील पाच दिवसांपासून गुवाहाटीत आहेत. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही ते अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची आता हकालपट्टी निश्चित मानली जात आहे.
हेही वाचा: शिवसेनेच्या बंडखोर ३७ आमदारांची गोची! आता उरले ‘हे’च तीन पर्याय
भाजपशी फारकत घेत शिवसेनेने २०१९ मध्ये परंपरागत विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री होईल, असे भाष्य केलेले असतानाच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे स्वत: मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याच मंत्रिमंडळात मुलगा आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री झाले. मंत्रीपद न मिळाल्याने आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेकजण नाराज झाले. वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. यंदाच्या (२०२२-२३) अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला मोठा निधी मिळेल, असा विश्वास सर्वांना होता. पण, सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला आणि तेथूनच आघाडीत धुसपूस सुरु झाली. निधी पळवापळवीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनातच भाष्य करीत आगीत तेल ओतण्याचे काम केले होते. दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनीही काही नेत्यांच्या मागे तपास व चौकशीचा ससेमिरा सुरु केला आहे. अनेक मतदारसंघात भाजपच्या तुलनेत शिवसेना आमदारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचेच आव्हान आहे. या व्यथा मांडण्यासाठी मंत्री, आमदारांसह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनाही मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुखांची वेळ मिळत नव्हती. त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढत गेली. मंत्री असूनही काही कामे होत नसल्याने त्यांना दुसऱ्या पक्षातील संबंधित विभागाच्या मंत्र्यांना हात जोडावे लागत होते. ही खदखद राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीतून उघड झाली आणि बंडखोरीचा मार्ग सुकर झाला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ५६ पैकी ४१ आमदारांनी पक्षाविरूध्द बंडाचे निशाण फडकावले. आता त्या आमदार-मंत्र्यांविरूध्द पक्षाने कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. त्यामुळे त्या आठ मंत्र्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा: खासगी वाहनांना मासिक हप्ता! १२ हजाराचा पहिलाच हप्ता घेताना ‘पीएसआय’ पकडला
यांची मंत्रीपदे धोक्यात
एकनाथ शिंदे (नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री), गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री), दादा भुसे (कृषी मंत्री), संदीपान भूमरे (रोहयो व फलोत्पादन मंत्री), बच्चू कडू (जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालविकास राज्यमंत्री), अब्दुल सत्तार (महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री) व शंभूराज देसाई (गृह राज्यमंत्री), राजेंद्र पाटील-यड्रावकर (आरोग्य राज्यमंत्री) हे कॅबिनेट व राज्यमंत्री पक्षाविरूध्द बंडखोरी करून परराज्यात गेले आहेत.
हेही वाचा: पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानीच! मैदानी ५० तर लेखी १०० गुणांची परीक्षा
बंडखोरांमधील खदखद अन् आरोप
मुख्यमंत्रीपद देऊन काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेची घडी विस्कटण्याचा प्रयत्न
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जनताभिमुख व सर्वाधिक निधीची खाती
मुख्यमंत्री शिवसेनेचा असतानाही ज्यांना कायम विरोध केला, त्यांच्याशीच जुळवून घेण्याची वेळ
सत्ता असूनही शिवसेनेची वाढ होत नसल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज
बाळासाहेबांचे भाजपसोबत अनेकदा मतभेद होऊनही त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली नाही
Web Title: Expulsion Of Eight Shiv Sena Ministers Three Cabinets And Five Ministers Of State In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..