रेशन दुकानेही होणार आता 'कॅशलेस'

अमित गोळवलकर
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पुणे - नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध आस्थापना, दुकाने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जात आहेत. बँकांमध्ये नोटा नसल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आता राज्यातील रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आजच त्याबाबतचा आदेश काढला आहे. 

पुणे - नोटबंदीच्या निर्णयानंतर विविध आस्थापना, दुकाने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने जात आहेत. बँकांमध्ये नोटा नसल्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आता राज्यातील रेशन दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आजच त्याबाबतचा आदेश काढला आहे. 

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने आज हा आदेश काढून राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये यापुढे कॅशलेस पद्धतीने व्यवहार करण्याची सुविधा असेल असे जाहीर केले आहे. यासाठी सर्वप्रथम शिधापत्रिका धारक व स्वस्त धान्य दुकानदार यांना आपल्या आधार कार्डाची नोंदणी बँक खात्याशी संलग्न करुन घ्यावी लागणार आहे. या निर्णयामुळे आता ग्राहकांना ई-वाॅलेट आणि मोबाईल फोन या दोन मार्गांनी स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे. 

मोबाईलद्वारे म्हणजेच *99# या सेवेचा वापर करुन व्यवहार करण्यासाठी शिधापत्रिकाधारक आणि रेशन दुकानदार या दोघांचेही खाते नॅशनल पेमेंट काॅर्पोरेशन आॅफ इंडियाशी संलग्न असलेल्या बँकांमध्ये असणे आवश्यक आहे. जनधन योजनेअंतर्गत असलेली खाती तसेच बँकांमध्ये असलेल्या बचत खात्यांवरुनही हे व्यवहार करता येणार आहेत. या व्यवहारांसाठी शिधापत्रिका धारक आणि रास्त धान्य विक्री दुकानदार या दोघांकडेही चालू क्रमांकाचा मोबाईल असणे आवश्यक आहे. ग्राहकांना या सेवेची माहिती त्यांच्या बँकांमधूनही मिळू शकते. 

या व्यतिरिक्त ई-वाॅलेटद्वारेही ग्राहकांना शिधापत्रिका दुकानामध्ये व्यवहार करता येणार आहेत. यासाठी विविध बँकांनी ई-वाॅलेट सेवा सुरु केली आहे. त्याचाही वापर करुन शिधापत्रिका धारकांना रेशन दुकानांमधून धान्य खरेदी करता येणार आहे. 

या दोन्ही पद्धतींपैकी कुठलीही पद्धत वापरुन व्यवहार पूर्ण केल्यानंतर शिधापत्रिकाधारकाकडून पूर्वीप्रमाणेच ग्राहकाला पावती दिली जाईल. या पद्धतीने पैसे स्वीकारले जाण्याबाबतचा फलक दुकानदारांना आपल्या दुकानात दर्शनी भागात लावावा लागेल. रेशन दुकानदारांना या नव्या पद्धतीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही तालुकानिहाय केली जाणार आहे.

Web Title: Fair price shops to be cashless in Maharashtra; GR by Fadnavis Cabinet