फेक पोस्ट, अफवा मीडियाने रोखाव्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

मुंबई - सोशल मीडियावरील फेक पोस्ट आणि अफवांवर मीडिया व्यवस्थापनाकडून प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

मुंबई - सोशल मीडियावरील फेक पोस्ट आणि अफवांवर मीडिया व्यवस्थापनाकडून प्रतिबंध करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

ॲड्‌. सागर सूर्यवंशी यांनी ही याचिका केली आहे. यावर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सोशल मीडियावर फेक अकाऊंट सुरू करून खोट्या आणि गैरसमज निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल केल्या जातात. असे फेक अकाऊंट शोधून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. फेक पोस्टना प्रतिबंधात्मक यंत्रणा उभारण्याची मागणीही याचिकेद्वारे करण्यात आली आहे. अनेक संवेदनशील प्रकरणांबाबत टाकण्यात आलेल्या फेक पोस्टमुळे समाजस्वास्थ्य बिघडते  आणि अशांतता निर्माण होते, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच आधार कार्डसारखी सरकारी कागदपत्रे अशा अकाऊंटशी लिंक केली तर खोटी अकाऊंट उघड होऊ शकतात, असा दावाही याचिकादाराने केला आहे. 

नियंत्रणासाठी यंत्रणा नाही
सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याकरता परदेशातून नियंत्रित होणारी यंत्रणा केंद्र सरकारकडे नाही. त्यामुळे संबंधित मीडिया व्यवस्थापनालाच याबाबत निर्देश देणे आवश्‍यक आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. दोन आठवड्यांनंतर याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Web Title: Fake posts, rumors should be blocked by media