साडेनऊशे किलोमीटरचा प्रवास करूनही शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

सरकारकडून दुष्काळी मदत मिळाल्यानंतर ही देणी देण्याचे सूर्यभान नरसप्पा कुंभार (रा. मोरवंची, जि. सोलापूर) यांनी ठरविले. त्यांची रक्‍कम यवतमाळच्या बॅंकेत जमा झाल्याने त्यांनी रातोरात यवतमाळ गाठले. यासाठी साडेनऊशे किलोमीटरचा प्रवास करून त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. 

सोलापूर - मागच्या वर्षी पावसाअभावी शेतातील खरीप पिके होरपळून गेल्याने बॅंकेचे कर्ज अन्‌ किराणा आणि खत दुकानदारांची थकबाकी होती. सरकारकडून दुष्काळी मदत मिळाल्यानंतर ही देणी देण्याचे सूर्यभान नरसप्पा कुंभार (रा. मोरवंची, जि. सोलापूर) यांनी ठरविले. त्यांची रक्‍कम यवतमाळच्या बॅंकेत जमा झाल्याने त्यांनी रातोरात यवतमाळ गाठले. यासाठी साडेनऊशे किलोमीटरचा प्रवास करून त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. 

कुटुंबाची परिस्थिती सुधारेल म्हणून दोन वर्षांपूर्वी डाळिंब, पेरू व बोर पिकांची सव्वातीन एकरांत लागवड केली. अडीच लाखांचा खर्च करूनही दुष्काळामुळे झालेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे बॅंकेच्या कर्जाचा हप्ता आणि मुलांच्या शिक्षणाचे शुल्कदेखील भरता आले नाही. सरकारकडून दुष्काळी मदत म्हणून कुंभार यांना २१ हजार ६०० रुपये मिळाले. या रकमेतून देणी फेडून मुलांना शैक्षणिक साहित्य आणि नवी कपडे घेता येतील, या आशेने त्यांनी मोहोळची बॅंक गाठली. त्यांची रक्‍कम यवतमाळच्या बॅंकेत जमा झाल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. कुंभार यांनी क्षणाचाही विलंब न लावता ४६७ किलोमीटरचा प्रवास करीत यवतमाळ गाठले. मात्र रक्‍कम मोहोळच्या बॅंकेत वर्ग केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मोहोळच्या बॅंकेत गेले; परंतु तेथूनही त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. अशा प्रकारे साडेनऊशे किलोमीटरचा प्रवास करूनही कुंभार यांच्या पदरी निराशेशिवाय काहीच आले नाही.

केंद्र व राज्य सरकारकडून दुष्काळासाठी मिळालेला सर्वच निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. चुकांची दुरुस्ती करून तहसीलदार स्तरावरील प्रलंबित रक्‍कम तत्काळ वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.
- सुभाष उमराणीकर, सहसचिव, मदत व पुनर्वसन विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer frustration in solapur