
Farmer Long March : "तरीही माघार नाहीच"; मृत शेतकऱ्याचे कुटुंबीय आंदोलनावर ठाम
Farmer Long March Latest News: कांद्याला हमीभाव, कर्जमाफी, अवकाळीमुळे झालेलं नुकसान अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लाँग मार्चची वाट धरली आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या या मोर्चामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पण तरीही त्याच्या कुटुंबीयांनी मोर्चामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Latest News)
किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला होता. दोन दिवसांपासून हा मोर्चा वाशिंद इथं मुक्कामी आहे. याच दरम्यान, नाशिकमधल्या माऊडी इथले शेतकरी कुंडलिक जाधव यांना अस्वस्थ वाटू लागलं, उलट्या होऊ लागल्याने त्यांना प्रथमोपचार देऊन शहापूरमधल्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं.
पण उपचारापूर्वीच या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मात्र तरीही आंदोलनातून आपण माघार घेणार नाही, अशी भूमिका जाधव कुटुंबीयांनी घेतली आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, तसंच सरकारने आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा जाधव कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे, तसंच बैठकीच्या फेऱ्याही झाल्या आहेत. मात्र तरीही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे लवकरच हे लाल वादळ मुंबईमध्ये धडकण्याची चिन्हं दिसत आहेत.