शेतकऱ्यांना सावकारांकडून सव्वाचार लाखांचा कर्जपुरवठा

तात्या लांडगे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

यंदा 1682 कोटींचे वाटप; फसवणूक प्रकरणांत वाढ

यंदा 1682 कोटींचे वाटप; फसवणूक प्रकरणांत वाढ
सोलापूर - राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात पिके नसल्याने बॅंकांकडूनही वेळेवर आणि पुरेसे कर्ज मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर यंदा राज्यातील 12 हजार 228 खासगी परवानाधारक सावकारांनी 4 लाख 29 हजार 230 जणांना 1 हजार 682 कोटी 11 लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती सहकार आयुक्‍त कार्यालयाकडून देण्यात आली. मागील साडेचार वर्षांत सावकारकीतून फसवणूक झाल्याच्या सुमारे 28 हजारांहून अधिक तक्रारी दाखल झाल्याचेही या वेळी सांगण्यात आले.

यंदा खरीप हंगामात बॅंकांनी 47 टक्‍केच कर्जवाटप केले, तर रब्बी हंगामात आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 22 टक्‍के कर्जवाटप झाले आहे. त्यातच दीड वर्षाचा कालावधी लोटला तरी राज्यातील 30 टक्‍के शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. बॅंका कर्जवाटपापूर्वी कर्जदाराच्या पिकाची व आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करतात. तसेच, कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेचाही अंदाज घेतात. या कटकटीमुळे शेतकरी त्याच्या गरजेसाठी खासगी सावकाराचे दार ठोठावत असल्याचे चित्र पहायला मिळते. यातून तारण जमिनी, मालमत्ता हडपण्याचे प्रकारही वाढल्याचे दिसून येते.

राज्याची स्थिती
परवानाधारक सावकार - 12,228
कर्जवाटप - 1682.11 कोटी
कर्जदार - 4.29 लाख

Web Title: Farmer Moneylender Loan