बळिराजाला घामाची योग्य किंमत द्या - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

शिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच अवघ्या समाजाचे जीवनमान अवलंबून असल्याने शेतमालाच्या बाजारभावाबाबत कुठलीही तडजोड करू शकत नाही’’, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शासनकर्त्यांना दिला.

शिरूर - ‘‘बळिराजाला त्याच्या घामाची योग्य किंमत द्या, बाकी कुठलीही तक्रार नाही. परंतु शेतमालाच्या बाजारभावात चालढकल सहन करू शकत नाही. शेतकऱ्यांवरच अवघ्या समाजाचे जीवनमान अवलंबून असल्याने शेतमालाच्या बाजारभावाबाबत कुठलीही तडजोड करू शकत नाही’’, असा निर्वाणीचा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शासनकर्त्यांना दिला.

न्हावरे (ता. शिरूर) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुजाता पवार, कुसुम मांढरे व राजेंद्र जगदाळे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, शिरूर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम आदी या वेळी उपस्थित होते. कोट्यवधी जनतेच्या पोटापाण्याचा, भुकेचा प्रश्‍न सोडवतो त्याला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळालेच पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘केंद्रातील राज्यकर्ते म्हणतात, तुम्ही उत्पादकाचा विचार करता; पण आम्ही खाणाऱ्यांचा विचार करतो. देशात उत्पादक म्हणजे शेतकरी आहे. जर उत्पादन करणाराच संकटात गेला तर खाणाऱ्यांची काय अवस्था होईल.

खाण्याचे साहित्य परदेशातून आणावे लागेल. एके काळी भुकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी अमेरिकेतून मिलो आणावा लागला होता. उत्पादकाला योग्य दाम न दिल्यानेच देशाची ती दैना झाली होती. शेतकऱ्याला न सावरल्यास पुन्हा तशी स्थिती उद्भवू शकते. परदेशातून धान्य आणायचे नसेल; तर इथल्या शेतमालाला योग्य दाम मिळाले पाहिजे.’’ सध्याचे राज्यकर्ते शेतकरी, शेतमाल, निर्यात धोरण याबाबत अजिबात गंभीर नसल्याची टीका पवार यांनी केली. ते पुढे म्हणाले, ‘‘यापूर्वी शेतकऱ्यांविषयी काळजी घेतली जायची. त्यांना प्रोत्साहन दिले जायचे. त्यामुळेच शेतकरी आत्मनिर्भर होऊन प्रगतीकडे वाटचाल करीत होते. ज्या देशाला बाहेरील अन्नधान्य मोठ्या प्रमाणात आणावे लागायचे, त्याच देशातील शेतकरी धान्योत्पादनात स्वयंपूर्ण झाला असून, तो आता तब्बल १८ देशांना धान्य देतो, ही अभिमानाचीच बाब म्हणावी लागेल. मात्र, सध्याच्या सरकारचे धोरण शेतकऱ्यांबाबत सहानुभूतीचे आहे का, हे तपासावे लागेल.’’ 

मेळाव्याचे निमंत्रक, माजी आमदार ॲड. अशोक पवार यांनी पवारांच्या राजवटीत तालुक्‍यात झालेल्या विकासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘‘या दुष्काळी भागाचे नंदनवन केवळ पवारसाहेब व अजित पवार यांच्यामुळेच झाले आहे. त्यांच्या शेतकरीविषयक धोरणांमुळेच या परिसरात समृद्धी आली.’’ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मंगेश ढवळे यांनी सूत्रसंचालन केले.

‘आजी-माजी आमदारांची तुलना करा’
शिरूर तालुक्‍याच्या विकासासाठी आम्ही सर्वतोपरी लक्ष घातले. विकासकामे करून तालुक्‍याचा लौकिक वाढवण्यासाठी अशोक पवार यांनी कष्ट घेतले. त्यांच्यामुळे तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलला; पण मागील विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही त्यांना थांबवले. ‘राष्ट्रवादी’चा विचार अव्हेरून ज्यांचा विचार तुम्ही केला, त्यांनी साडेचार वर्षात या भागातील लोकांचे जीवन बदलण्यासाठी काय केले आणि अशोक पवारांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत काय झाले, याची डोळस तुलना करा व येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत चोख काम करा.

Web Title: Farmer Work Agriculture Rate Sharad Pawar