बळिराजाच्या विम्यावर कंपन्याच मालामाल

तात्या लांडगे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

दोन वर्षांत 14 लाख शेतकरी भरपाईपासून वंचित
 

रब्बी हंगामाची स्थिती 
2017-18 

12.77 लाख 
विमा भरलेले शेतकरी 

2.53 लाख 
भरपाईस पात्र शेतकरी 

215.57 कोटी रु 
विमा संरक्षित रक्‍कम 

80.62 कोटी रु 
मिळणारी भरपाई 

सोलापूर : मागील दोन वर्षांत राज्यातील 20 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी रब्बीसाठी पिकविमा भरला. मात्र, त्यापैकी फक्‍त सहा लाख 27 हजार शेतकरीच भरपाईसाठी पात्र ठरले असून, उर्वरित 14 लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. विमा भरूनही भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांची वणवण सुरू असताना, दुसरीकडे मात्र विमा कंपन्यांना 135.57 कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे दिसून येते.

उंबरठा उत्पन्न, चालू वर्षीचे सरासरी उत्पन्न, विमा संरक्षित रक्‍कम या निकषांनुसार बहुतांशी शेतकरी भरपाईसाठी अपात्र ठरतात. 2016-17 मध्ये रब्बी हंगामात राज्यातील 7.51 लाख शेकऱ्यांनी विमा भरला. त्यामध्ये शेतकरी हिस्सा 18 कोटी 35 लाख रुपये, तर केंद्र व राज्य सरकारचा प्रत्येकी 22 कोटी चार लाखांचा हिस्सा होता. मात्र, त्यापैकी फक्‍त 3.74 लाख शेतकऱ्यांना 32 कोटी 68 लाखांची भरपाई मिळाली. दुसरीकडे विमा कंपन्यांना 62 कोटी 43 लाख रुपये अधिक मिळाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील भरपाई अद्याप मिळालेली नसून, त्यातूनही विमा कंपन्यांनाच फायदा होतो, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

2017-18 मध्ये रब्बी हंगामासाठी पीकविमा भरलेल्या राज्यातील शेतकऱ्यांची माहिती विमा कंपन्यांकडून आठ दिवसात कृषी विभागाला मिळेल. त्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्‍कम वर्ग करण्यात येईल. - विजय घावटे, संचालक, विस्तार व प्रशिक्षण (कृषी)

Web Title: on Farmers crop insurance Companies are Moneylenders