शेतकरी कर्जमुक्तीसाठी विरोधकांचे वरातीमागून घोडे 

सिद्धेश्वर डुकरे - सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी सध्या जोरकस लावून धरली आहे. आक्रमक झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या आमदारांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर विधानसभा दणाणून सोडत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यास सरकारला भाग पाडले. 

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी सध्या जोरकस लावून धरली आहे. आक्रमक झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या आमदारांनी कर्जमुक्तीच्या मागणीवर विधानसभा दणाणून सोडत दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यास सरकारला भाग पाडले. 

आक्रमक विरोधी पक्षाच्या या कामगिरीमागे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकत्याच केलेल्या आंदोलनाचा धसका असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी करत स्वाभिमानी संघटनेने विधान भवनावर धडक घेत आंदोलन केले. यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या संघटनेकडून "हायजॅक' होणार तर नाही ना या भीतीने आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत कामकाज बंद पाडल्याचे राजकीय जाणकार सांगतात. शेतकरी कर्जमाफी हा सरकारच्या विरोधातील महत्त्वाचा मुद्दा असल्याचे विरोधी पक्षाचे मत आहे. सरकारमधील पक्ष असलेल्या शिवसेनेनेही कर्जमुक्तीसाठी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या जवळीकतेचा वापर करून राज्यातील शेतकरी यांना कर्जमुक्त करण्याची मागणी केली आहे; तसेच विरोधी पक्षातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही कर्जमुक्तीची मागणी केली आहे. मात्र, अचानकपणे सरकारला राज्यात आणि केंद्रात पाठिंबा असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी विधान भवनावर कर्जमुक्तीसाठी तूर आणि कांदा फेकून आंदोलन केले. त्यामुळे हा मुद्दा आपल्या हातून निसटून जातोय की काय, अशी भीती वाटल्यानेच विधान सभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आक्रमक झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

Web Title: Farmers Debt Relief congress NCP