
तात्या लांडगे
सोलापूर : ऑगस्टमधील अतिवृष्टीने दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट या तीन तालुक्यातील ४१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल आहे. पण, उर्वरित आठ तालुक्यातील ज्या महसूल मंडळात सततचा पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांचेही पंचनामे केले जाणार आहेत. त्या बाधित शेतकऱ्यांनाही (दोन हेक्टरच्या प्रमाणात) नुकसान भरपाई मिळणार आहे.
अतिवृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील सुमारे ४१ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. सध्या त्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून वस्तुनिष्ठ पंचनामे सुरू आहेत. याशिवाय सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचेही पंचनामे करण्याचे आदेश आहेत. त्यांनाही नुकसान भरपाई मिळणार आहे. पण, यासाठी त्या सर्वांना कृषी विभागाच्या ‘ई-पीक पाहणी ॲपवर लागवड केलेल्या पिकांचे फोटो व क्षेत्र, याची माहिती भरावी लागणार आहे.
नोंदणीसाठी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत मुदत असून मुदतीत पिकांची ऑनलाइन नोंद करण्याचे शेतकऱ्यांना बंधनकारक आहे. त्याशिवाय बाधितांना पिकांची नुकसान भरपाई किंवा विमा संरक्षित रक्कम मिळणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी सर्व्हर डाऊन असल्याने या ॲपमध्ये माहिती भरता येत नव्हती, पण आता माहिती भरणे सुरू झाले आहे. मुदतीत सर्व शेतकऱ्यांनी पिकांची नोंद ऑनलाइन करून घ्यावी, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
सततचा पाऊस म्हणजे काय?
जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळात सलग पाच दिवस किमान १० मिलिमीटर किंवा त्याहून जास्त पाऊस झाला आहे, त्याला सततचा पाऊस म्हटले जाते. दुसरीकडे २४ तासांत ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्याची अतिवृष्टी म्हणून नोंद होते. सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांपोटी सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते.
नुकसानीचे पंचनामे सुरू
अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू असून तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकारी तो अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवतील. पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांची कोणती पिके बाधित झाली आहेत हे स्पष्ट होईल. त्यावेळी नुकसानीचे क्षेत्र वाढेल किंवा कमी देखील होऊ शकते.
- शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.