टोल नाका लवकरच कोंडीमुक्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

राज्यातील 36 टोल नाक्‍यांवर लवकरच "फास्ट टोल टॅग सिस्टीम' बसवण्यात येणार आहे. या संदर्भात इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. त्यामुळे या टोल नाक्‍यांवर डिसेंबरपासून स्वतंत्र हायब्रीड (कॅशलेस आणि फास्ट टॅग) मार्गिका सुरू होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई - राज्यातील 36 टोल नाक्‍यांवर लवकरच "फास्ट टोल टॅग सिस्टीम' बसवण्यात येणार आहे. या संदर्भात इंडियन हायवे मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. त्यामुळे या टोल नाक्‍यांवर डिसेंबरपासून स्वतंत्र हायब्रीड (कॅशलेस आणि फास्ट टॅग) मार्गिका सुरू होण्याची शक्‍यता आहे.

टोल नाक्‍यांवर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी "फास्ट टोल टॅग' प्रणाली राबवण्याचा निर्णय "एमएसआरडीसी'ने घेतला आहे. त्यासाठी टोल नाक्‍यांवर दुरुस्तीसह पायाभूत सोईसुविधा द्याव्या लागणार आहेत. सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर लगेच हे बदल करण्यास सुरवात झाल्याचे "एमएसआरडीसी'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जलद पथकर टॅग यंत्रणेसंदर्भात टोल प्लाझा चालकांसोबत "एमएसआरडीसी'च्या अधिकाऱ्यांनी नुकतीच बैठक घेतली. या वेळी टोल नाकी अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. "फास्ट टोल टॅग' यंत्रणेसाठी टोल नाकाचालकांनी सहकार्य करावे, अशी विनंती अधिकाऱ्यांनी केली. हे काम तीन टप्प्यांत होणार असून, पहिल्या टप्प्यात स्वतंत्र मार्गिका सुरू केली जाईल, असे "एमएसआरडीसी'चे सहसंचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.

'फास्ट टोल टॅग' वाचण्यासाठी प्रत्येक हायब्रीड मार्गिकेत अँटेना आणि रडार बसवले जातील. सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम करणार आहे. केंद्र सरकारने प्रत्येक टोल नाक्‍यासाठी किमान 25 लाख रुपये खर्च करण्यास सांगितले असून, त्यातील 15 ते 20 लाख रुपये प्राथमिक कामांवर खर्च केले जातील. त्यासाठी टोल प्लाझा मालकांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया) या कामासाठी निम्मी रक्कम देणार आहे.

वेळेत बचत
राज्यात सध्या सरकारी मालकीची 20 आणि "एमएसआरडीसी'च्या अखत्यारीतील 16 अशी 36 टोल नाकी आहेत. "फास्ट टोल टॅग' यंत्रणेमुळे वाहनचालकांच्या वेळेची बचत होईल. टोल नाक्‍यातून वाहन बाहेर पडण्यासाठी सध्या लागणारा 15 ते 20 मिनिटांचा कालावधी अवघ्या तीन ते चार मिनिटांवर येईल, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fast toll tag system Traffic Free Tolla Naka