esakal | पंधरा वर्षांचा काळ लोटला तरी मानसेवी डॉक्टर स्थायीच्या प्रतीक्षेत | Amravati
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

पंधरा वर्षांचा काळ लोटला तरी मानसेवी डॉक्टर स्थायीच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
राज इंगळे

अचलपूर (जि. अमरावती) : राज्याच्या भरारी पथकातील मानसेवी वैद्यकीय अधिकारी आज नाही तर उद्या स्थायी होऊ म्हणून दिवस-रात्र कमी मानधनावर आदिवासीबहुल भागांत सेवा देत आहेत. मात्र मानसेवी डॉक्टर मागील पंधरा वर्षांपासून समायोजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता या डॉक्टरांमध्ये रोष निर्माण झाला आहे. शासनाने तत्काळ मानसेवी डॉक्टरांना स्थायी करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्यातील मानसेवी डॉक्टर करीत आहेत.

राज्याच्या संपूर्ण आदिवासी जिल्ह्यात नवसंजीवनी योजनेंतर्गत २८१ डॉक्टर्स कार्यरत असून, त्यात २२ डॉक्टर्स मेळघाटातील आहेत. राज्यातील १६ आदिवासी जिल्ह्यांतील आदिवासी भागात नवसंजीवनी योजनेंतर्गत मानसेवी वैद्यकीय अधिकारी कार्यक्षेत्रात जाऊन सेवा देतात. सोबतच आश्रमशाळेत तपासणीचे काम करतात.

विशेष म्हणजे हे मानसेवी वैद्यकीय अधिकारी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागातील जवळपास आठ ते दहा गावांना सेवा देतात. या सेवेदरम्यान ते बाह्यरुग्ण तपासणी, गरोदर माता, स्तनदा माता व कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रांना इतर राष्ट्रीय कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मदत करीत असतात.

विशेष म्हणजे त्यांना इतर लाभ मिळत नाहीत. असे असतानाही कोविडच्या संकटात आरोग्यसेवेसाठी बहुमोल योगदान देत आहेत. असे असतानाही या मानसेवी डॉक्टरांना मागील पंधरा वर्षांपासून स्थायी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या रिक्त जागा उपलब्ध आहेत आणि मानसेवी डॉक्टरांची संख्या तीनशेच्या आत आहे, तरीसुद्धा आरोग्य विभागाचे अधिकारी समायोजन करण्यास टाळाटाळ करीत आहेत

विशेष म्हणजे मागील महिन्यातच न्यायालयाने आरोग्य विभागावर ताशेरे ओढले आहेत. असे असूनसुद्धा आरोग्य विभाग रिक्त जागा भरण्यास चालढकल करीत आहे. याचा परिणाम आरोग्यसेवेवर होत आहे. त्यामुळे शासनाने अधिक विलंब न करता या रिक्त जागांवर मानसेवी डॉक्टरांच्या नियुक्त्या करून त्यांचे समायोजन करावे, अशी मागणी भरारी पथकातील मानसेवी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाच्या संकटात जीवाची हमी नसताना डॉक्टरांनी कोविड सेंटरवर सेवा दिली. असे असताना आजही मानसेवी डॉक्टरांना मागील पंधरा वर्षांपासून स्थायी करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आता आमचा अंत न पाहता शासनाने मानसेवी डॉक्टरांना स्थायी करावे व न्याय द्यावा.

- डॉ. प्रमोद शिंदे, सचिव, मानसेवी वैद्यकीय संघटना नाशिक

loading image
go to top