
'पुनावालांनी धमक्या देणाऱ्यांची तक्रार नोंदवावी; आम्ही संरक्षण देऊ'
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी आज सोमवारी म्हटलंय की, अदर पुनावाला यांनी त्यांना आलेल्या धमक्यांबाबत रितसर तक्रार नोंदवावी. मी त्यांना खात्री देतो की, सरकार त्याचा खोलात जाऊन तपास करेल.
सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला हे सध्या लंडनमध्ये असून त्यांनी 'द टाईम्स' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांना भारतातील बड्या हस्तींकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप केला होता. लशीच्या मागणीवरुन असलेल्या प्रचंड अपेक्षांच्या दबावामुळे त्यांच्या कुटुंबासहित ते लंडनला गेल्याचं त्यांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय की, पूनावाला यांनी याबाबत रितसर तक्रार नोंदवावी. धमक्यांबाबतचे डिटेल्स आणि फोन नंबर त्यांनी पुरवावेत. आम्ही त्याचा खोलात जाऊन तपास करु. पूनावालांनी भारतात परतावं. काँग्रेस पक्ष त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी उचलेल, अशी खात्रीही त्यांनी दिली.
हेही वाचा: लसनिर्मितीसाठी कटीबद्ध; केंद्राच्या खुलाशावर 'सीरम'सुद्धा सहमत
लोकांचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे लसनिर्मिती फक्त भारतातच व्हावी. केंद्र सरकारने त्यांना याआधीच 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. गरज असल्यास त्यांना अधिक सुरक्षा पुरवण्यात येईल. काँग्रेस देखील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेईल. त्यांना कुणीही हात लावणार नाही. त्यांनी परत यावं आणि लस उत्पादनाचं काम करावं, असंही त्यांनी म्हटलं.
कोविशील्ड लशीचे निर्माते अदर पुनावाला यांनी 'द टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता. त्यांनी म्हटलं होतं की मला धमक्या मिळत आहेत, आणि सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यांनी या मुलाखतीत म्हटलं होतं की, आपल्या देशातील श्रीमंत आणि मोठ्या मोठ्या राजकीय हस्थींकडून त्यांना या धमक्या येत आहेत. आणि यामुळे ते कोरोना लशीचे उत्पादन लंडन मध्ये करण्याच्या तयारीत आहेत, असं म्हटलं जात आहे. 'The Times' ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. या वृत्तात जगातील सर्वात मोठे लस उत्पादक अदर पुनावाला यांनी म्हटलंय की, फोन कॉल ही सर्वात वाईट गोष्ट आहे. निरंतर येणारे फोन कॉल्स अत्यंत त्रासदायक आहेत.
Web Title: File Complaint About Threats Nana Patole To Sii Ceo
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..