'त्या' दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

पुण्याच्या कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाल्याचा मुद्दा आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

मुंबई : कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या अपघाताप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पुन्हा चुकीचे काम करण्याचे बिल्डरांनी धाडस करू नये, अशी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी आज (सोमवार) विधानसभेत केली.

पुण्याच्या कोंढवा परिसरात संरक्षक भिंत कोसळून 15 मजूर ठार झाल्याचा मुद्दा आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर दोन-चार दिवस त्याची चर्चा होते. नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. बांधकाम व्यावसायिक दोन-तीन महिने बेपत्ता राहतात आणि पुढे काहीही होत नाही, याकडे अजित पवार यांनी सरकारचं लक्ष वेधलं.

बांधकाम करताना बिल्डर महापालिकेच्या बांधकाम नियमावलीकडे दुर्लक्ष करतात. गुंठेवारीची हजारो बांधकामे कोंढवा परिसरात सुरू आहेत. त्याठिकाणी सुरक्षेचे कुठलेही निकष कामगारांसाठी पाळले गेलेले नाहीत. कामगारांची बांधकाम व्यावसायिकाने नोंदच ठेवली नसल्याने त्यांना मदत मिळण्यातही अडचणी येत आहेत. बिल्डर करोडो रुपये कमवतात आणि संरक्षक भिंत कमकुवत बांधतात, याप्रकरणात जे कुणी बिल्डर असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणीही अजित पवार यांनी विधानसभेत केली.

हे काम सुरू असताना सोसायटीने महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार केली होती; परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचे अजितदादा पवार यांनी विधानसभेत सांगितले. 

कोंढवा दुर्घटनेतील जबाबदार बिल्डरला काळ्या यादीत टाकण्याची मागणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली. तसेच हे बांधकाम पुढे करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. कोंढवा परिसरात बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. शिवाय नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या बांधकामांना पायबंद घालण्यात यावा, अशी मागणीही दिलीप वळसे-पाटील यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To file a criminal case against them says Ajit Pawar