अखेर नाणार प्रकल्प रद्द : सुभाष देसाई

अखेर नाणार प्रकल्प रद्द : सुभाष देसाई

मुंबई : कोकण किनारपट्टीवर लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला. या संदर्भातील अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याची माहितीही देसाई यांनी पत्रकारांना दिली.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युतीसंदर्भात घातलेल्या अटींत नाणार प्रकल्प रद्द करण्यावर शिवसेनेने भर दिला होता. भाजपचे स्थानिक नेते या प्रकल्पामुळे कोकणाचा चेहरामोहरा बदलेल, असा पवित्रा घेऊन आक्रमक झाले होते. युतीचा निर्णय झाल्यानंतर यासंदर्भात तडजोड करू नका, यासाठी भेटी, आश्‍वासनांचा सपाटा लावल्यानंतरही आजअखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करणे थांबवा, असे आदेश देणारी अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी जारी केल्याची माहिती देसाई यांनी दिली.

भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या तीन बड्या ऑइल कंपन्या आणि "सौदी अरामको' यांच्यातर्फे संयुक्‍तरीत्या राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी तीस लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. या प्रकल्पाअंतर्गत दहा लाख रोजगार निर्माण होतील, असेही सांगण्यात येत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यात येणारी चौदा गावे; तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावांतील सुमारे सहा हजार हेक्‍टर जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात येणार होती. सरकारने यासाठी जमीन मालकांशी संपर्क साधणेही सुरू केले होते. या भागात केवळ साडेसातशे कुटुंबे निवासाला असून, विस्थापनाचा प्रश्‍न मोठा नसल्याचेही सौदी कंपनीला सांगण्यात आले होते.

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस; तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व राजकीय पक्षांनी या प्रकल्पाला विरोध केला होता. नाणारविरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम यांनी याविरोधात सातत्याने लढा सुरू ठेवला. कोकणातील पर्यावरणाचा ऱ्हास होईल, मासेमारी; तसेच पर्यटनावर गदा येईल, अशी भूमिका शिवसेनेने घेतली होती. प्रारंभी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे, त्याबद्दल गैरसमज नकोत, असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेनेने युतीसाठी प्रकल्प रद्द करण्याची अट टाकली आणि ती आता मान्य झाली आहे.

पश्‍चिम किनाऱ्यावरील अन्य एखाद्या जागी हा प्रकल्प आता हलवला जाईल. गुजरात किंवा ओडिशात प्रकल्प जाण्याची शक्‍यता आहे. प्रकल्प रद्द केल्याबद्दल शिवसेनेच्या नेत्यांनी आनंद व्यक्‍त केला. कोकणात आमदार राजन साळवी यांनी फटाके फोडले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com