तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी 103 कोटी रुपयांच्या निधीस अर्थमंत्र्यांची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

राज्यातील महत्त्वाच्या अशा 19 तीर्थक्षेत्रांची निवड करण्यात आली असून त्यांच्या विकासासाठी 103 कोटी रुपयांच्या निधीस आज (बुधवार) अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मान्यता दिली आहे. 

मुंबई : राज्याच्या अलीकडेच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली होती. त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार आता राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. 

राज्यात अनेक तीर्थक्षेत्रे असल्याने त्याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही जास्त आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि तेथील सोयीसुविधांची स्थिती म्हणावी तेवढी चांगली नसल्यामुळे भक्तीला पर्यटनाची जोड देण्यासाठी तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. 

यासाठी राज्यातील महत्त्वाच्या अशा 19 तीर्थक्षेत्रांची निवड करण्यात आली असून त्यांच्या विकासासाठी 103 कोटी रुपयांच्या निधीस आज (बुधवार) अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मान्यता दिली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व बसस्थानकांचे रुप पालटणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. त्यामुळे या सर्व बसस्थानकांचे रुपडे पालटणार हे नक्की.   

१९ तीर्थक्षेत्रे आणि त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे :

अक्‍कलकोट (5.90 कोटी), भिमाशंकर (3.50कोटी), त्र्यंबकेश्‍वर (3.00 कोटी), मुक्‍ताईनगर (3.50 कोटी), कळंब (5.10 कोटी), लोणी रिसोड (3.50 कोटी), ऋणमोचन भातुकली (3.50 कोटी), वेरूळ (4.70कोटी), खुलताबाद (4.90 कोटी), राजूर गणपती (2.90 कोटी), औंढा नागनाथ (5.20 कोटी), तुळजापूर (जुने) (4.60 कोटी), परळी वैजनाथ (5.00 कोटी), मार्कंडादेव (2.00 कोटी), धापेवाडा (6.50 कोटी), पंढरपूर (30.00 कोटी), चामोर्शी (5.00 कोटी), सप्‍तश्रृंगी (3.00 कोटी), जाम (4 कोटी) या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance Minister approves Rs 103 crore fund for pilgrimage development