वित्तीय बाजाराचा लाभ शेतकऱ्यांनाही मिळावा - पंतप्रधान

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 25 डिसेंबर 2016

मुंबई - राज्यातील किमान 10 स्मार्ट शहरे म्युनिसिपल बॉंड्‌सच्या माध्यमातून विकसित व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत वित्तीय बाजाराचा लाभ शेतकऱ्यांना देखील मिळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले. ते आज सेबीच्या राष्ट्रीय प्रतिभूती बाजार संस्थान (एनआयएसएम)च्या नव्या संकुलाचे उद्‌घाटन करताना बोलत होते. याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अरुण राम मेघवाल यांची उपस्थिती होती. पाताळगंगा (रायगड) औद्योगिक वसाहतीतील एनआयएसएमच्या नव्या संकुलाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

पंतप्रधान म्हणाले की, आयपीओंना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ते यशस्वी झाले असे आपण ऐकतो; पण आपल्या दृष्टीने मोठी संपत्ती निर्माण व्हावी हे अपेक्षित नाही, तर खऱ्या अर्थाने भांडवली उत्पादकता वाढली पाहिजे. आपल्याकडे सरकार आणि बॅंका, वित्तीय संस्था या पायाभूत सुविधांसाठी नेहमी अर्थसाहाय्य करतात; मात्र हाच पैसा दीर्घकाळासाठी भांडवली बाजारातून मिळाला, तर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा देशात तयार होतील. आपल्या सरकारने देशातील शहरे सुधारण्यासाठी चांगली योजना आणली आहे. मात्र, अद्यापपर्यंत तरी भांडवली बाजारातून शहरांच्या सुविधेसाठी पैसा उपलब्ध झाल्याचे आपण पाहिले नाही. देशातील किमान 10 स्मार्ट शहरांसाठी तरी असे बॉंड्‌स निघावेत, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्राला देखील या भांडवली बाजारातील गुंतवणुकीचा लाभ मिळाला तर यात अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम पार पाडता येतील आणि त्याचा फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल असे सांगून, पंतप्रधानांनी राष्ट्रीय कृषी मंडीचा (इनाम) उल्लेख केला. कमोडिटी मार्केटमधून शेतकऱ्यांसह देशालाही अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.

संलग्नता मिळवून देण्यासाठी कायदा - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सेबीला त्यांच्या सर्व उपक्रमांना राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य मिळत राहील असे आश्वस्त केले. ते म्हणाले की, सेबी ही जगातली सर्वांत विश्वासार्ह नियंत्रक संस्था असून, हे स्थान अनेक वर्षं पुढे टिकून राहील असा मला विश्वास आहे. एनआयएसएमला संलग्नता मिळवून देण्यासाठी येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात निश्‍चितपणे तशा स्वरूपाचा कायदा केला जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

Web Title: Financial markets might benefit farmer