आर्थिक दुर्बल घटकांसाठी ‘अमृत’

Mantralaya-Mumbai
Mantralaya-Mumbai

मुंबई - खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ‘ॲकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग’ (अमृत) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. राज्यातील ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’च्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून, त्यात या समाजसमूहातील तरुणांच्या विकासासाठी विशेष कार्य केले जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विविध घटकांच्या विकासासाठी यापूर्वी ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ संस्थांची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्‍यक होते. या समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्राप्त होत आहे. मात्र, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या संस्थांच्या धर्तीवर ‘अमृत’ ही संस्था स्थापन करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.

अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ‘बार्टी’, तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने ‘सारथी’ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा जोतिबा फुले यांच्या नावाने महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे. आता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अमृत’ ही संस्था काम करणार आहे. संस्थेची स्थापना व कार्यान्वयानासाठी वेळोवेळी आवश्‍यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार या विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com