

तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होणार आहे. पोर्टलवर कनिष्ठ महाविद्यालय वाटपाची यादी आणि गुणवत्ता यादीनुसार कनिष्ठ महाविद्यालयांच्या नावांसमोर प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे असणार आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत प्रवेश घ्यायचे आहेत. प्रवेशासाठी राज्यातील साडेबारा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, पण त्यातील साडेसोळा हजार विद्यार्थ्यांनी लिंगाची (स्त्री, पुरुष) नोंदच केलेली नाही.
प्रवेश फेरीच्या पहिल्या गुणवत्ता यादीचा ‘कट ऑफ’ अधिकच असणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळालेला नाही, त्यांना अर्जात भरलेला महाविद्यालयांचा पसंतीक्रम बदलता येणार आहे. तत्पूर्वी, पहिल्या गुणवत्ता यादीनुसार ज्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज मिळाले आहे, त्याठिकाणी प्रवेश घ्यायचा असल्यास अर्जात ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’वर क्लिक करावे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी त्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे व प्रवेश निश्चित करावा.
याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसल्यास त्यांनी त्यास नकार कळवायचा आहे. कोटा (व्यवस्थापन, संस्थाअंतर्गत व अल्पसंख्यांक कोटा) प्रवेशाचीही पहिली यादी शुक्रवारीच (ता. २९) प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन राहिलेल्या जागा दुसऱ्या प्रवेश फेरीपूर्वी महाविद्यालयांना प्रसिद्ध कराव्या लागणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचा पसंतीक्रम निवडता येणार आहे.
१ जुलै किंवा १५ जुलैला सुरु होणार अकरावीचे वर्ग
अकरावी प्रवेशाची दुसरी प्रवेश फेरी ५ जूननंंतर प्रसिद्ध होईल. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने उर्वरित तीन प्रवेश फेऱ्या देखील याद्या जाहीर होतील. त्यानंतर १ जुलै किंवा १५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरु होतील, यादृष्टीने माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
एकूण पाच प्रवेश फेऱ्या, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी
अकरावी प्रवेशाच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून शेवटची फेरी मुलींसाठी विशेष असणार आहे. प्रत्येक प्रवेश फेरीपूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही, त्यांना https://mahafyjcadmissions.in या संकेस्थळावर नोंदणी करता येणार आहे. प्रवेश फेऱ्या पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी सुरुच राहील, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी
एकूण नोंदणी
१२,५१,२९४
अर्ज लॉक करणारे विद्यार्थी
९,०८,४०४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.