पहिला प्रीमियर 105 वर्षांचा

संतोष भिंगार्डे
शनिवार, 21 एप्रिल 2018

"राजा हरिश्‍चंद्र'ला ऐतिहासिक झळाळी

"राजा हरिश्‍चंद्र'ला ऐतिहासिक झळाळी
मुंबई - सध्या चित्रपटांचे भव्य-दिव्य प्रीमियर आणि स्पेशल शो होत असले, तरी भारतात पहिल्यावहिल्या चित्रपटाचा प्रीमियर 21 एप्रिल 1913 या दिवशी झाला होता. ग्रॅंट रोड (लॅमिंग्टन रोड) येथील ऑलम्पिया थिएटरमध्ये चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या "राजा हरिश्‍चंद्र' या चित्रपटाचा हा प्रीमियर शो होता. त्याला शनिवारी (ता. 21) तब्बल 105 वर्षे पूर्ण होणार आहेत.

"राजा हरिश्‍चंद्र' चित्रपट 3 मे 1913 या दिवशी ग्रॅंट रोड येथील कॉरोनेशन या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता; मात्र त्याचा प्रीमियर 21 एप्रिलला झाला. त्याचे उद्‌घाटन सर डॉ. भालचंद्र भाटवडेकर यांनी केले. तसेच पंडित रामकृष्ण भांडारकर, सॉलिसीटर विमा दलाल, स्मॉल कॉज कोर्टाचे न्यायाधीश डोनाल्ड यांच्यासह अन्य काही मान्यवर मंडळी उपस्थित होती. रात्री नऊ वाजता हा शो ठेवण्यात आला होता.

सगळ्यांना या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता होती; हा चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांनी दादासाहेब फाळके यांचे टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात कौतुक केले. सध्या इतिहासजमा झालेल्या नाझ थिएटर येथे ऑलम्पिया आणि कॉरोनेशन ही थिएटर होती. त्यानंतर वेस्टर्न आणि न्यू वेस्टर्न ही थिएटर्स उभी राहिली आणि नंतर नाझ सिनेमा अस्तित्वात आला. चित्रपटसृष्टीची पंढरी म्हणून तो ओळखला जाऊ लागला. आता त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. खरे तर त्या वेळी दादासाहेबांना "राजा हरिश्‍चंद्र' हा चित्रपट तयार करताना अनेक संकटे आली, त्यांच्यावर मात करून हा चित्रपट तयार केला होता.

अखेर स्वप्न सत्यात उतरले...
भारतीय चित्रपटाच्या पहिल्या प्रीमियर शोबाबत माहिती देताना दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी सांगितले, की त्या वेळी काही जणांनी दादासाहेबांवर टीकाटिप्पणी केली. त्यांच्या कलेबद्दल काहींनी शंका उपस्थित केली; परंतु अस्सल भारतीय मातीतील चित्रपट तयार करण्याचे दादासाहेबांचे ध्येय होते, ते त्यांनी अपार मेहनत घेऊन पूर्ण केले.

Web Title: first premier raja harishchandra movie