तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्यांची ११९ परीक्षा केंद्रे आहेत. दहावीचे विद्यार्थी १८८ केंद्रांवर परीक्षा देतील. बारावीचे ५४ हजार ८७५ आणि दहावीचे ६४ हजार ४५४ विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्ह्यात ४० भरारी पथके नेमली जाणार आहेत. त्यात महसूल, शिक्षण व जिल्हा परिषदेतील आरोग्य, बांधकाम अशा सर्वच विभागाचे अधिकारी असणार आहेत.
दहावी-बारावीच्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर व प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, त्या केंद्रांवरील हालचाली टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरे देखील लावले जाणार आहेत. लेखी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी ठोस नियोजन केले आहे.
दरम्यान, आता ज्या केंद्रावर कॉपी किंवा गैरप्रकार आढळतील, त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना किमान अर्धा तास आधी पोचणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अंगझडती घेऊनच त्यांना आत सोडले जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक असेल. भरारी पथके देखील बहुतेक केंद्रांना भेटी देईल, असे नियोजन करण्यात आले आहे.
महिलांचे एक विशेष पथक
इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण ४० भरारी पथके असतील. त्यात बोर्डाची सात भरारी पथके देखील आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या पथकांमध्ये तीन शिक्षणाधिकारी, तीन उपशिक्षणाधिकारी, ‘डाएट’चे प्राचार्य, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची पथके असतील. महिलांचे एक विशेष पथक असणार आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
‘या’ ५० केंद्रांवर विशेष लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील २२ केंद्रे अशी आहेत, ज्याठिकाणी विद्यार्थी कमी आहेत पण तेथे प्रवेश जास्त झाले आहेत. जे विद्यार्थी ‘जेईई’, ‘नीट’च्या तयारीसाठी परजिल्ह्यात राहायला आहेत, अशांनी त्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतल्याचा संशय आहे. याशिवाय सुमारे २५ ते २८ संवेदनशिल केंद्रे देखील आहेत. या केंद्रांवर ‘महसूल’ची पथके ठाण मांडून असणार आहेत. याशिवाय भरारी पथकांचे सर्वाधिक लक्ष या केंद्रांवर असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरात भरारी पथकांची अशीच स्थिती राहणार आहे.
‘या’ वेळेनंतर विद्यार्थी आल्यास परीक्षेला बसता येणार नाही
यंदा इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन झाले, परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ऑफलाईनच झाले होते. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तुकडीची प्रवेश क्षमता ६०, ९० असताना देखील त्या कॉलेजमधील १२० ते १५० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. अशा केंद्रांवर भरारी पथकांचे विशेष लक्ष असणार आहे. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांनी १० वाजता केंद्रावर येणे अपेक्षित आहे. पेपर सुरु होण्याच्या वेळेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रावर येता येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी परवानगी नसणार आहे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.