
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार चालवताना किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी होईल याकडे कॉंग्रेस मंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि घटनेला अनुसरून काम झाले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी कॉंग्रेसचे मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत केले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
टिळक भवन येथे आज कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची व मंत्र्यांची बैठक महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि सरचिटणीस व प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले, की या सरकारचे काम किमान समान कार्यक्रमावर आधारित चालावे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे जे जिल्हे पालकमंत्री म्हणून आले आहेत, त्या जिल्ह्यांत कॉंग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच, ज्या जिल्ह्यांना कॉंग्रेसचा पालकमंत्री नाही, त्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनी सरकारच्या योजना, सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवून कॉंग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा.
सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी
थोरात म्हणाले, की आतापर्यंतच्या सरकारच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला, तसेच पुढे कसे जायचे यावरही चर्चा करण्यात आली. किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.
बैठकीला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आदींची उपस्थिती होती.