पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढीवर भर देणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

आदिवासीबहुल भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचा आहारात वापर वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.

नाशिक - आदिवासीबहुल भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पौष्टिक तृणधान्याचे उत्पादन वाढवण्याबरोबर त्याचा आहारात वापर वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. त्यासाठीच्या उपाययोजनांच्या शिफारशींसाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या दलाला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिराच्या लागवडीस प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवण्यात येणार आहे. कृती दलाला पौष्टिक तृणधान्यांची लागवड, त्यांचा आहारातील वापर, विपणन प्रणाली, मागणी व पुरवठा याचा अभ्यास करून सद्यःस्थिती सरकारला सांगायची आहे. त्याचबरोबर या पिकांच्या शेतीच्या आर्थिक उत्पन्नाचे विश्‍लेषण करावयाचे आहे. सध्याचे वाण, त्यांची उत्पादन क्षमता, त्यांच्या लागवड व उत्पादन साखळीत आधुनिक तंत्रज्ञान वापराची सद्यःस्थिती, उत्पादकतेतील तफावतीचे विश्‍लेषण आणि तफावत दूर करण्यासाठी उपाययोजना याचीही माहिती सरकारला द्यायची आहे.

हैदराबादच्या संस्थेचे मार्गदर्शन
हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कृषी आयुक्तांनी कृती दलाचा अहवाल तयार करावयाचा आहे. त्यासाठी सर्व विभागांनी संस्थेला माहिती उपलब्ध करून द्यावयाची आहे. कृती दलाच्या बैठकांत विषयांतील तज्ज्ञांचा कृषी आयुक्त बोलावू शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Focus on the growth of nutritious cereal production