राज्यात यंदा भीषण टंचाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

दुष्काळसदृश जाहीर झालेली गावांची - धुळे (50 गावे), नंदूरबार (195 गावे), अहमदनगर (91), नांदेड (549), लातूर (159), पालघर (203), पुणे (88), सांगली (33), अमरावती (731), अकोला (261), बुलडाणा (18), यवतमाळ (751), वर्धा (536), भंडारा (129), गोंदिया (13), चंद्रपूर (503), गडचिरोली (208). 

मुंबई - यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच राज्यात चारा आणि पाणी टंचाईला जनतेला सामोरे जावे लागत असल्याने सरकारने उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. 

खरीप हंगाम 2018 मध्ये राज्यातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या उर्वरित 4,518 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या गावांमध्ये दुष्काळ उपाय योजनांच्या आठ सवलती देण्यात येणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन संहिता, 2016 मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्यातील 151 तालुक्‍यामध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत तालुक्‍याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या 75 टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमानाच्या 750 मिलिमीटरपेक्षा कमी झाला आहे, अशा 268 महसुली मंडळामध्येही राज्य शासनाने यापूर्वीच दुष्काळ घोषित केला आहे. तसेच विविध जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेले अहवाल विचारात घेऊन जून ते सप्टेंबर या कालावधीत 750 मिलिमीटरपेक्षा कमी पर्जन्यमान असलेल्या महसुली मंडळातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या 931 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या गावांमध्येही आठ उपाय योजना राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे. 

या यादीत न आलेल्या परंतु जनतेची व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेऊन अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या व अद्याप दुष्काळसदृश परिस्थिती घोषित न केलेल्या 4518 गावांमध्येही राज्य शासनाने दुष्काळी उपाय योजनांच्या सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या गावांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडित न करणे आदी उपाय योजना राबविण्यात येणार आहेत. 

दुष्काळसदृश जाहीर झालेली गावांची - धुळे (50 गावे), नंदूरबार (195 गावे), अहमदनगर (91), नांदेड (549), लातूर (159), पालघर (203), पुणे (88), सांगली (33), अमरावती (731), अकोला (261), बुलडाणा (18), यवतमाळ (751), वर्धा (536), भंडारा (129), गोंदिया (13), चंद्रपूर (503), गडचिरोली (208). 

Web Title: Fodder and water scarcity in Maharashtra state this year