अन्नातून विषबाधा; 27 चिमुकल्यांसह 140 ग्रामस्थांची प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात देण्यात आले होते हे जेवण.

अकोला : अकोट तालुक्यातील हिंगणी बु. येथे रविवारी (ता.14) एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गावात जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, जेवण झाल्यानंतर दुपारी भर उन्हात जेवणातून 140 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार येथे घडला आहे. यामध्ये 27 चिमुकल्यांचा समावेश असून, या सर्वांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगणी येथे दरवर्षीप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाही जेवणाच्या कार्यक्रमाची उत्साहात तयारी करुन आयोजन करण्यात आले होते. हिंगणी हे धार्मिक स्थळ असल्याने येथे बाहेरगावच्या पाहुण्यांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी जमते. रविवारी पाहटेपासून स्वयंपाक बनविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान ग्रामस्थांचे जेवण करुन घरी आराम करीत होते.

सुरवातीला चिमुकल्यांना उलटी, मळमळ सुरू झाली. त्यानंतर एक-एक करीत लहान मोठ्यांसह गावातील जवळपास 140 जणांना विषबाधा होत उलटी सुरू झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. यामध्ये 27 चिमुकल्यांचा समावेश असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

Web Title: Food Poison to 140 Peoples in Akola