नंदलाल अस्त्र शिवसेनेच्या पथ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - माजी सनदी अधिकारी नंदलाल यांनी केलेले नवे वक्‍तव्य शिवसेनेच्या पथ्यावर पडले असून, या आधारे भाजपला घेरायची रणनीती शिवसेनेने आखली आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी "सकाळ'ला दिली. 

मुंबई - माजी सनदी अधिकारी नंदलाल यांनी केलेले नवे वक्‍तव्य शिवसेनेच्या पथ्यावर पडले असून, या आधारे भाजपला घेरायची रणनीती शिवसेनेने आखली आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी "सकाळ'ला दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शी कारभारावरून शिवसेनेवर हल्लाबोल चढविला असतानाच आता शिवसेनेनेही नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत झालेले गैरव्यवहार ज्येष्ठ सनदी अधिकारी नंदलाल यांच्या चौकशी अहवालात समोर आले होते, असा दावा शिवसेनेने आज केला. आमदार अनिल परब यांनी काल पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर हल्ला केला. ते म्हणाले, की फडणवीस महापौर असताना स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारासोबत परस्पर वाटाघाटी केल्या. निविदांविना ठराविक कंत्राटदारांना काम दिल्याचा ठपका नंदलाल समितीने ठेवला होता. क्रीडा साहित्य, औषध खरेदी गैरव्यवहार झाले होते. या प्रकरणी काही नगरसेवकांना अटकही झाली. आपण केवळ आरोप करत नाही, अहवालाच्या आधारे बोलत आहोत, असे परब यांनी सांगितले. या गैरव्यवहारप्रकरणी फडणवीस यांच्यावर कोणताही ठपका नसल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. तसेच आज दिवसभरात याच मुद्द्यावर चर्चा सुरू होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने हाच मुद्दा उचलत शिवसेनेवर पलटवार करण्याचा निर्णय घेतला होता. 

थेट संबंध नाही-  नंदलाल 

नंदलाल यांनी आज नवीन वक्‍तव्य करून खळबळ उडवून दिली. नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची जबाबदारी आपल्यावर होती. चौकशीत तथ्य असल्याचे आढळून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महापौर या नात्याने त्यात थेट संबंध नव्हता, मात्र महापौर म्हणून या प्रकरणाला ते जबाबदार असल्याचे नंदलाल यांनी स्पष्ट केले. हाच मुद्दा प्रचारात उचलण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून उद्यापासून (ता. 17) शिवसेना नेते फडणवीस यांना लक्ष्य करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Former IAS officer nandlal statement