'इसिस'शी संबंधित चार संशयितांना अटक

पीटीआय
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला
मुंबई/लखनौ - देशात मोठ्या हल्ल्याची योजना आखणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना आज पाच राज्यांच्या पोलिस पथकांनी एका संयुक्त अभियानादरम्यान अटक केली. त्याशिवाय काही लोकांना ताब्यातही घेतले आहे.

दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला
मुंबई/लखनौ - देशात मोठ्या हल्ल्याची योजना आखणाऱ्या चार संशयित दहशतवाद्यांना आज पाच राज्यांच्या पोलिस पथकांनी एका संयुक्त अभियानादरम्यान अटक केली. त्याशिवाय काही लोकांना ताब्यातही घेतले आहे.

दिल्ली पोलिसचे विशेष कक्ष, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथक तसेच आंध्र प्रदेश, पंजाब आणि बिहारच्या पोलिस पथकांच्या संयुक्त अभियानादरम्यान आज सकाळी मुंब्रा (महाराष्ट्र), जालंधर (पंजाब), नरकटियागंज (बिहार), बिजनौर आणि मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथे छापे टाकले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) पोलिस महानिरीक्षक असीम अरुण यांनी नोएडा येथे एका निवेदनाद्वारे माहिती देताना म्हटले आहे की, दहशतवादी कटाची योजना आखण्याच्या आरोपावरून चौघांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व संशयित इस्लामिक स्टेटच्या (इसिस) खोरासन मॉड्युलशी संबंधित असून, देशात मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची त्यांची योजना होती.

बिजनौर जिल्ह्यातून अटक करण्यात आलेले मुफ्ती फैझान आणि तनवीर हे इसिसच्या संपर्कातील आहेत. मुंब्रा (जि. ठाणे) येथून अटक करण्यात आलेला शमशाद अहमद (वय 26) हा मूळचा बिजनौरचा असून, मुझम्मील जालंधर जिल्ह्यातील आहे. सहा जणांची कोठडीत रवानगी करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे अरुण यांनी सांगितले. या सर्वांकडून इसिसशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. संशयित इंटरनेटवरून एकमेकांच्या संपर्कात होते. केंद्रीय सुरक्षा संस्थांनी या मोहिमेत महत्त्वाची कामगिरी बजावली.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा तसेच व्यवस्था) दलजित चौधरी यांनी लखनौ येथे सांगितले, की आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, गटाला ओळख मिळावी आणि दहशतीचे वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने हे संशयित दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त मोहिमेत मुंब्रा येथून तीन जणांना ताब्यात घेतले असून, त्यातील एकाला दहशतवादी कारवायांमधील सहभागाच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. अन्य दोघांची चौकशी सुरू असल्याचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. दरम्यान, या मोहिमेत आणखी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून, पोलिस त्यांची चौकशी करत आहेत. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध आवश्‍यक कारवाई केली जाईल, असे उत्तर प्रदेश एटीएसच्या प्रवक्‍त्याने सांगितले. हे सर्व जण युवा वर्गातील असून, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले जातील. इंटरनेटवरील माहितीने प्रेरित झालेले हे युवक असावेत, असेही त्यांनी नमूद केले.

भारत-नेपाळ सीमेवरही संशयिताला अटक
बेतियाह - दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने एका संयुक्त मोहिमेत पश्‍चिम चंपारण जिल्ह्यात आज भारत-नेपाळ सीमेजवळ एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे या संशयिताला बेलवा गावातून अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप याविषयी कोणतीही माहिती दिली नाही.

ऑपरेशन मुंब्रा
मुंबई/ठाणे - मुंब्रा येथून अटक करण्यात आलेला नाझीम शमशाद अहमद मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे.

त्याच्यासोबत राहणाऱ्या गुलफाम आणि उजैफा अबरार यांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली; परंतु त्यांच्या चौकशीतून फारसे काही हाती न लागल्याने त्यांना सोडून देण्यात आले. नाझीम 2014 पासून मुंब्य्राच्या देवरीपाडा येथील समाधान अपार्टमेंटच्या 302 क्रमांकाच्या सदनिकेत भाडेकरू म्हणून राहत होता.

नाझीमचा हॅंडलर परदेशी असल्यामुळे तो इसिससाठी काम करत असावा, असा संशय आहे. नाझीम चॅट ऍप्लिकेशनद्वारे परदेशातील हॅंडलरच्या संपर्कात होता. त्याने तरुणांना दहशतवादी गटात ओढण्यासाठी त्यांचा व्हॉट्‌सऍप ग्रुपही तयार केला होता. तो आणि त्याच्या संपर्कात असलेले तरुण घातपात घडवण्याचा कट रचत असल्याचे आणि तरुणांचे ब्रेनवॉश करत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार देशभर कारवाई करण्यात आली.

दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी एक विशेष व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार करण्यात आला होता. त्याद्वारे माहितीची देवाणघेवाण करून प्रत्येक यंत्रणेला विशिष्ट जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी काही दिवसांपासून नाझीमच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्याच्या मुसक्‍या आवळण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेण्यात आला. त्यानुसार चार पोलिस यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी पहाटे त्याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. देशातील अन्य काही ठिकाणीही संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

घरात पेप्सी कोला तयार करून नाझीम सायकलवरून त्याची विक्री करण्यासाठी रोज बाहेर पडत असे, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. समाधान अपार्टमेंटखाली उभी असलेली त्याची सायकल शेजाऱ्यांनी दाखवली. त्याचा एक साथीदार अंडीविक्री करत असल्याचे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले.

Web Title: four isis suspected arrested