Fraud Marriages : शुभमंगल ‘सावधान’! ‘शादीराम घरजोडे’ सुसाट

तोतया कुंटुबीयांकडून वर पक्षाची फसवणूक!
Fraud Marriages
Fraud Marriagessakal

पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका तोतया वधूने एका युवकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेने खळबळ उडालेली असताना असे प्रकार बहुतांश भागात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. अर्थात अशा प्रकारचे संकेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळत असतात, मग चित्रपट का असेना. दोन दशकांपूर्वी गोविंदा-करिष्मा कपूरचा ‘कुली नंबर वन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. कुली असलेल्या वराला (गोविंदा) धनाढ्य बापाचा मुलगा असल्याचे सांगून मध्यस्थ सदाशिव अमरापूरकर ऊर्फ शादीराम घरजोडे हा होशियारचंद म्हणजेच कादरखान यांच्या मुलीला फसवतो. हाच अनुभव प्रत्यक्षातही येत आहे. बनावट चित्र उभे करून लग्न जमविणाऱ्यांचा, फसवणूक करणाऱ्या घटनांचा ‘सकाळ’च्या बातमीदारांनी चांदा ते बांदापर्यंत धांडोळा घेतला.

मुंबई-उपनगर

समस्या :

मुंबईत लग्नासाठी इच्छुक तरुण-तरुणी हे ‘मॅट्रिमोनिअल’ संकेतस्थळावर नोंदणी करतात. संकेतस्थळावरच्या प्रोफाईलच्या माध्यमातून माहिती काढून अनेक तरुण, तरुणींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

स्वरूप

बोरिवलीत राहणारे ३९ वर्ष वयाचे सुरेश सहा वर्षांपासून लग्नासाठी मुलीच्या शोधात आहे. एके दिवशी एका अनोळखी व्हाट्सअॅप नंबरवर त्यांना वधूच्या फोटोसह परिचयपत्र आले. तुमचा बायोडेटा मुलीला आवडला असून लग्नाची बोलणी करू, असे त्या मध्यस्थी व्यक्तीकडून सांगण्यात आले. या व्यक्तीने ५ हजारांची मागणी केली; मात्र लग्न जुळल्यानंतर पैसै देईल, असे सुरेश यांनी स्पष्ट केले. दरम्यान मध्यस्थी व्यक्तीने पाच हजार देण्यासाठी तगादा लावला. सुरेश यांनी त्याला तीन हजार पाठवले, उर्वरित दोन हजार लवकरच पाठवण्याचे आश्वासन दिले. पैसै पाठविल्यानंतर त्या मुलीचा व मध्यस्थाचा फोन लागला नाही. संबंधित मुलीचा पत्ताही बोगस निघाला. तसेच मुंबईच्या भुलेश्वरमध्ये राहणाऱ्या एका महिलेला लग्नाचे प्रलोभन दाखवून दीड लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार घडला.

तक्रार:

मुंबईत २०२१ मध्ये १६ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्यात ५ जणांना अटक झाली. २०२२ मध्ये फसवणुकीची ३१ प्रकरणे समोर आली, यामध्ये ९ जणांना अटक झाली. २०२३ या वर्षात १२ प्रकरणे समोर आली आहे. नोंदणी झालेल्या गुन्ह्यापेक्षा फसवणुकीचे प्रमाण कितीतरी जास्त आहे; मात्र बदनामीच्या भीतीने अनेक कुटुंब तक्रार करण्यास येत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मुंबईसह राज्यात अविवाहित तरुणांची लग्न जुळत नसल्याची समस्या मोठी आहे. याचा फायदा उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणात लग्न जोडून देणारे .बनावट दलाल सक्रिय झाले आहेत. लग्न जुळवून देण्याचे आश्वासन देऊन या तरुणांची आर्थिक फसवणूक केली जाते. ब्लॅकमेलिंगचे प्रकारदेखील सुरू झाले आहेत.

- मंगेश सोनावणे, प्रमुख, मर्जी संघटना, मुंबई

अहमदनगर

समस्या

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी, शेवगाव आदी तालुक्यांत मुलांच्या लग्नाची समस्या आहे. बेरोजगारी हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. मुलगी देण्याच्या अमिशाने फसवणूक होते, तथापि, गुन्हे दाखल होत नाहीत.

स्वरूप:

मुलगी शोधून देणारे म्हणजेच लग्न जमविणारे काही सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे एजंट असतात. लग्न जमवून दिल्यास एक लाखांपर्यंत मागणी करतात. अनेक प्रकरणात लग्न झाल्यानंतर मुलगी दागिने घेऊन पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. अशावेळी फसवणूक झालेले कुटुंबीय पोलिसांत जाण्याचे टाळतात. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे चार-पाच गुन्हे दाखल दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढे काय कारवाई झाली, याबाबत समजू शकले नाही. परंतु अशा प्रकरणे चव्हाट्यावर आणल्याशिवाय फसवणूक करणाऱ्यांनाही चाप बसणार नाही.

पीडितांची स्थिती

फसवणूक होत असलेल्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याचे दिसून येते. विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे.

ग्रामीण भागात जाण्यास शिक्षित मुली तयार नसतात. शेतकरी कुटुंबात मुली जाण्यास नकार देतात. अल्प उत्पन्न गट, नोकरी नसलेल्या मुलांचा मोठा सामाजिक प्रश्न आहे. फसवणूक झाल्यास गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. फसवणुकीबाबत जिल्ह्यात टोळ्या सक्रिय  आहेत. गुन्हे दाखल होत नसल्याने त्यांचे फोफावते. ऑनलाइन  फसवणूक होते. खोटे, फेक बायोडेटा असतात. फसवणुकीबाबत पोलिसांकडून पुरेशी कारवाई होताना दिसत नाही.

- डॉ. गिरीश कुलकर्णी, सामाजिक संशोधक (अध्यक्ष, स्नेहालय प्रकल्प)

सोलापूर

समस्या

सोलापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या १० - १५ वर्षांत लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने इच्छुक नवरदेवांसह त्यांच्या कुटुंबीयांना फसविण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षभरात सोलापूर शहर पोलिसांत अशा घटनांची नोंद झाली नसली तरी अशा घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातही घटना अनुभवास येत आहेत. मात्र, त्यांचे वर्गीकरण कौटुंबिक प्रकरणात होत असल्याने अशा घटनांची नेमकी आकडेवारी सांगता येत नसल्याचे ग्रामीण पोलिसांचे म्हणणे आहे.

स्वरूप:

बनावट वधूसह पालक उभे करून लग्न करायचे. त्यानंतर रोखींसह सोन्याचांदीचा ऐवज घेऊन वधू पसार झाल्याच्या घटना घडल्या. तर मुलींच्या बाबतीतही असे प्रकार घडले. यासाठी टोळ्या सक्रिय असल्याचेही तपासातून समोर आले आहे.

तक्रार

पीडित कुटुंबांनी घटनेनंतर पोलिसांत धाव घेतली आहे. परंतु त्याचा फारसा फायदा झालेला नसल्याचे दिसून आले नाही.

पीडितांची स्थिती

कामगार, शेतमजूर आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि विशेषतः शेतकरी कुटुंबांना अशा फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. अशा घटना घडण्यामागे गरिबी, कष्टाची कामे, दुष्काळी स्थिती, सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण जीवनाचा तिटकारा, शहरी जीवनाचे आकर्षण ही देखील कारणे आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत सधन कुटुंबांनाही फसविल्याच्या समोर आल्या आहेत.

वाढती विभक्त कुटुंब पद्धती, त्यामुळे नातेवाईकांसह लोकांशी संपर्क नसणे यामुळे लग्न जमविण्यात अडचणी येत आहेत. लग्नाला उशीर होईल, यावर डोळसपणे विश्वास ठेवून थोडे धैर्य बाळगायला हवे. धोके ओळखून प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्यास अशाप्रकारची फसवणूक टाळता येईल.

- प्रीती श्रीराम, समाजशास्त्र संशोधक

सातारा

समस्या

सातारा जिल्ह्यामध्ये युवकांची लग्न न होण्याची समस्याही १५ वर्षांपासून सुरू झाली आहे. बेरोजगारी, जमिनींच्या वाटण्या तसेच मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे बिनलग्नाच्या मुलांचा प्रश्न प्रत्येक गावात भेडसावत आहे. गेल्या १५ वर्षांपासून सुरू झालेल्या या प्रश्नाची दाहकता पाच वर्षांत तीव्र झाली आहे. बिनलग्नाचा मुलगा ही पालकांसाठी डोकेदुखी झाली आहे.

स्वरूप

विवाहावरून विवंचनेत असलेल्या पालक व मुलांच्या याच मानसिकतेचा फायदा घेणाऱ्या टोळ्याही जिल्ह्यात कार्यरत आहेत. युवकांचे लग्न जुळवून देणारी मराठवाडा व सोलापूर परिसरातील टोळ्यांकडून जिल्ह्यात फसवणूक झाल्याची उदाहरणे आहेत. या टोळ्या लग्न जुळवून देण्याच्या बदल्यात मुलाच्या वडिलांकडून लाखो रुपये घेतात. तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत हा दर आहे. त्यानंतर थाटामाटात लग्न पार पडते. लग्न झाल्यानंतर आमच्याकडील पद्धत आहे म्हणून दुसऱ्याच दिवशी मुला-मुलीला देवदर्शनासाठी म्हणून नेले जाते. रेल्वेने हा प्रवास ठरवला जातो. रात्री मुलगी व तिची पाठराखीण मध्येच कुठेतरी उतरून निघून जाते.

तक्रार:

सातारा जिल्ह्यात दहा वर्षांपासून संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मुलाचे लग्न झालेच पाहिजे, या विवंचनेत असलेल्या पालकांना फसवणाऱ्या टोळ्याही जिल्ह्यात कार्यरत आहेत. अब्रू जायला नको म्हणून फसवले गेलेले पालक तक्रारही करत नाहीत. त्यामुळे हाती धुपाटणे आले, या म्हणीप्रमाणे मुले व पालकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्यांचे समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पीडितांची स्थिती

पैसे मोजून लग्न ठरविणाऱ्या कुटुंबाची परिस्थिती तशी चांगली असते. नोकरी नसली, तरी मुलाला शेती जास्त असते, त्यामुळे गावात पतही असते. काही युवकांचा छोटा-मोठा व्यवसाय असतो; परंतु हसे व्हायला नको म्हणून मुलगा व पालक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जात नाहीत.

कोल्हापूर

समस्या

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा-बारा वर्षांपासून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. फसवणूक करणाऱ्या टोळ्याच सक्रिय आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने लग्नासाठी मुलगी मिळणे कठिण होत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे उच्चशिक्षित होणाचे प्रमाण वाढले आहे

स्वरूप

मुलींची अपेक्षित स्थळे उपलब्ध होत नसल्याने गरजू विवाहोच्छुक मुलांच्या पालकांना हेरून मुलींची डमी छायाचित्रे आणि बायोडेटा तयार करून पैसे उकळले जातात. ‘वर पाहिजे’ अशा जाहिराती देऊन इच्छुक वराच्या पालकांना मुलीची छायाचित्रासह माहिती देण्यात येते. मुलाची माहिती घेऊन मुलीला स्थळ पसंत आहे, असे सांगून ३ ते ५ हजार रुपये घेतले जातात. तोतया मुलीशी फोनवर बोलणे करून दिले जाते. भेटण्यासाठी मात्र टाळाटाळ केली जाते. अनाथआश्रमाला देणगी देऊन तेथील मुलीशी लग्न करता येते, अशी जाहिरात सोशल मीडियावरून करून त्या माध्यमातूनही फसवितात.

तक्रार

फसवणुकीची रक्कम फारशी मोठी नसल्यामुळे आणि बदनामीच्या भीतीने पोलिसांत तक्रार करणे टाळले जाते.

पीडितांची स्थिती

श्रीमंत व गरजू कुटुंबे हेरून त्यांची फसवणूक केली जाते. बदनामीच्या भितीने बहुतांश कुटुंब पोलिस ठाण्याकडे जात नाहीत. त्यामुळे बोगसगिरी करणाऱ्यांचे फावते.

लाखो तरुण लग्नाच्या उंबरठ्यावर असून अनेक बनावट वधु-वर सूचक मंडळ, एजंट तरुणांना व कुटुंबाना फसवत आहे. फसवणूक होऊनही बदनामीच्या भीतीने पीडित कुटुंबीय गप्प बसतात. काही ठिकाणी तर दुष्काळी भागातून गरजू मुलींना आणून त्यांना लग्नासाठी उभे करून, त्या माध्यमातूनही फसवणूक केली जाते.

- सुनील सामंत, कार्यसिद्धी विवाह संस्था

सांगली

समस्या

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत लग्न व्यवस्था अडचणीत आली आहे. ब्राह्मण, जैन, मराठा, लिंगायत या समाजात मुलींची संख्या कमी आहे आणि मुलींच्या अपेक्षा खूप जास्त आहे. विशेषतः दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी, छोटे व्यापारी आणि अल्पभूधारक तरुणांना लग्नासाठी स्थळ मिळणे दुरापास्त झाले आहे.

स्वरूप

बहुतांश कुटुंब शेतकरी आहेत. आर्थिक स्थिती मध्यम आहे. कर्ज काढून लग्नाला पैसे उभे करतात आणि फसतात. लग्न करू इच्छिणाऱ्या मुलांसाठी कर्नाटकातील मुलींचे स्थळ सुचवले जाते. अशा प्रकारचे काम करणारे खूप एजंट सध्या कार्यरत आहेत. एका लग्नामागे साधारणपणे तीन ते चार लाख रुपये खर्च ते सांगतात. किमान दोन तोळे सोने (सव्वा लाख रुपये), मुलीच्या पालकांना उचलून देण्यासाठी एक ते दीड लाख रुपये, आहेर आणि एजंट फी ५० हजार रुपये अशा रितीने खर्च करण्यास सांगितले जाते.

तक्रार

पोलिसांत गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण नगण्य आहे. तपासच पुढे सरकत नसल्याने पोलिस कच्ची नोंद पक्की करत नाहीत. सहा जणांशी लग्न केलेल्या एका महिलेला बेळगावात अटक झाली. त्यात फसणारा एक सांगलीचा होता. आटपाडीतील एकाचे लग्न ठरले. जिच्याशी लग्न ठरले तिचा नवराच एजंट झाला होता. त्यांनी सोने खरेदी व तयारीसाठी पैसे घेऊन पोबारा केला. मिरज ग्रामीण, वाळवा तालुक्यात याचे प्रमाण अधिक आहे.

पीडितांची स्थिती:

बहुतांश स्थळे कर्नाटकातील माळरानावर झोपडीवजा घरात वास्तव्यास असतात. तेथील मुलीशी लग्न करणारा फसतोच असा आजवरचा अनुभव आहे. लग्नानंतर ती माहेरी जाते आणि परत येतच नाही. त्यांच्या गावी शोध घेतला तर त्यांनी तळ सोडलेला असतो. अशी जिल्ह्यात दहा वर्षात किमान तीन-चारशे उदाहरणे असतील.

सहजपणे फसणारी माणसं मुळात भिडस्त स्वभावाची असतात. ती लग्नासाठीही शॉर्टकट शोधतात. परिणामांचा गांभीर्याने विचार करत नाहीत.

- कालिदास पाटील, मानसोपचार तज्ज्ञ

मराठवाडा

समस्या :

मराठवाड्यात दहा वर्षांपासून ही समस्या गंभीर होत आहे. तीन-चार वर्षांत याला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. आता तर ग्रामीण भागातील मुलांचे लग्न होणे अतिशय अवघड झाले आहे. नोकरी नाही, संपूर्ण कुटुंब शेतीवर किंवा मजुरीवर अवलंबून असल्याने मुली ग्रामीण भागात लग्नासाठी होकार देत नाहीत. त्यामुळे ग्रामीण मुलांचे लग्न होणे अतिशय अवघड आहे.

स्वरूप:

मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत ग्रामीण तसेच शहरात वधू-वरांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीमंत घरातील उपवर मुलांचा शोध घेत त्यांना विश्‍वासात घेतले जाते. तसेच सध्या काही ठिकाणी नावनोंदणी करण्यासाठी तीन ते चार हजार रुपये शुल्क घेतले जाते. नंतर मुलीचे फोटो दाखवत पसंती झाली तर यातून पैसे उकळले जातात. तसेच बोगस अनाथाश्रमाच्या नावानेही लूट केली जात होती. अनाथाश्रमातील मुलींचा विवाह करायचा असल्याचा संदेश अनेक सोशल माध्यमात टाकून संस्थेच्या खात्यात साडेसहा हजार रुपये टाकल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम केला जाईल, असे म्हणत लूट केली गेली आहे. तसेच बाजूच्या कर्नाटक राज्यातून वधू मिळेल म्हणून लोकांकडून पैसे उकळले जातात. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच नवरी, सोने-चांदी आणि रोख रक्कम घेऊन पसार झाल्याच्या अनेक घटना मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत घडल्या आहेत.

तक्रार

समाजातील बदनामीपोटी काही जण पोलिसांत तक्रार देत नाही. पुढे आपल्या मुलाचे लग्न होणार की नाही, याची त्यांनी भीती असते. २०१८ मध्ये जालना पोलिसांनी मुलीचे लग्न लावून आर्थिक फसवणूक करणारी मोठी टोळी जेरबंद केली होती. बीड जिल्ह्यात दोन वर्षांत दहा गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही असे अनेक प्रकार घडले.

पीडितांची स्थिती

मराठवाड्यात फसवणूक झालेले बहुतांश कुटुंब हे ग्रामीण भागातील, कमी शिक्षित, मध्यमवर्गीय आहेत. काही प्रकरणे श्रीमंत घरातीलसुद्धा आहे. पैसा, जमीनजुमला, घरदार असले तरी काही समाजघटकांत लग्नासाठी मुली मिळणे अतिशय कठीण झाले आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन दहा वर्षांत मराठवाड्यात लग्न जुळविण्यासाठी एजंटांच्या टोळ्या अस्तित्वात आल्या आहेत.

विवाह न झाल्यामुळे अनैतिक व्यवहार वाढले आहेत. अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. कुटुंब व्यवस्थेवर याचा ताण येतोय. विवाह न झाल्याने मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.

- यू. एम. उगिले, (प्राध्यापक, समाजशास्त्र, आर. पी. कॉलेज, धाराशिव)

मुलींचे घटते प्रमाण ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. उपवर मुलांना व त्यांच्या कुटुंबीयांना फसविण्याचे प्रमाण वाढत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सामाजिक जनजागृती झाली पाहिजे, पाश्चात्त्यांचे अनुकरण नको. नैतिक मूल्ये जपली पाहिजेत.

- प्रा. संजय मूलगीर, हिंगोली

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी

समस्या:

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात १५ वर्षांत लग्न न जुळण्याचे प्रमाण वाढले. मुलींच्या वाढत्या अपेक्षा, मुला-मुलींचे जन्मप्रमाण ही प्रमुख कारणे आहेत. शेती करणाऱ्या मुलांना मुली मिळण्याचे प्रमाण कमी आहे. श्रीमंत कुटुंबांची फसवणूक झाल्याचे प्रकार पुढे येत आहेत, मात्र पोलिसांत अद्यापी तक्रार नोंद नाही.

स्वरूप -

दोन्ही जिल्ह्यात लग्न जमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात एजंट कार्यरत आहेत, त्यासाठी ते मोठी रक्कम घेतात. एजंट एकमेकांसोबत जोडलेले असतात. अनेकदा केवळ दाखवण्याचा कार्यक्रम घडवून आणला जातो मात्र पुढे काहीच होत नाही. लग्नानंतर अनेकदा मुलगी सासरी राहत नाही. कारणे सांगून माहेरी जाते. आणण्याचा प्रयत्न होतो मात्र ती निघून जाते. अनेकदा मुलांकडून मुलीमध्ये दोष काढले जातात आणि मुलीला परत पाठविले जाते.

तक्रार

फसवणूक झालेले कुटुंब पोलिसात जात नाहीत. अनेकदा फसवले जातोय हेच समजत नाही. वधू-वरांच्या कुटुंबियांच्या हतबलतेचा फायदा घेतला जातो. मुलगी मिळत नाही या कारणास्तव इच्छुक नवरदेव किंवा त्यांच्या कुटुंबीयांना फसवल्याची एकही तक्रार नोंद नाही.

पीडितांची स्थिती

फसवणुकीत मध्यमवर्गीय अडकण्याचे प्रमाण जास्त आहे. बहुतेक ठिकाणी वरपक्षाकडील परिस्थिती चांगली होती.

ब्राह्मण आणि मराठा समाजात लग्न होण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे येत आहेत. मुली आणि मुलींच्या पालकांची वाढलेली अपेक्षा मुलांच्या लग्नामध्ये मोठी अडचण ठरत आहे. नवरा हवा , पण शेतकरी नको. सरकारी नोकरी हवी किंवा मोठ्या पगाराची नोकरी, मुंबईत स्वतःचा फ्लॅट हवा, अशा अटी ठेवल्या जात आहेत. शिक्षणामध्ये असलेला असमतोल अडथळ्याचा ठरत आहे. अनेक मुलींना परदेशात काम करणारा नवरा हवा आहे, त्यामुळे लग्नाचे वय वाढत आहे.

- डॉ. मिलिंद गोडबोले

विदर्भ -

समस्या

विदर्भातील अकरा जिल्ह्यापैकी केवळ बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये तरुण मुलांच्या लग्नाचा प्रश्न दिसून येतो. थोडेफार प्रकार यवतमाळ जिल्ह्यात आहेत. मात्र अन्यत्र असा प्रकार दिसून आलेला नाही. बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद यासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुलगी मिळत नसल्याची तक्रार आहे. विशेषतः शेतकरी मुलाला मुलगी देण्यास टाळाटाळ केली जाते.

स्वरूप

विदर्भातील बहुतांश भागात २५ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत कमिशन घेऊन बल्लारशा भागातून मुली पुरविणारे काही एजंट आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये अल्पभूधारक शेतकरी शेतमजुरांची चाळीस वर्षांपेक्षा अधिक वय झालेले किमान २० ते २५ मुले प्रत्येक गावात आहे. त्यांची समस्या कायम आहे.

पीडितांची स्थिती

यवतमाळ जिल्ह्यात लग्नासाठी मुली शोधण्यासाठी बाहेर गेल्यास शेतकरी पुत्र अथवा बेरोजगारांना मुली मिळत नाही.

दुसरीकडे आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील पालकांना दलालाकडून पैशांचे आमिष दाखवून मुलींचा विवाह गुजरात, राजस्थान आदी राज्यात केल्याची उदाहरणे आहे. यात काहींची फसवणूक झाली.

एकल पालक, गरीब व सामाजिकदृष्ट्या तुटलेल्या कुटुंबावर दलालांचा डोळा असतो. त्यामुळे अशा कुटुंबांनी सजगता बाळगणे गरजेचे आहे.

- प्रा. घनश्याम दरणे, सावित्रीबाई जोतिराव फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com