

तात्या लांडगे
सोलापूर : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन अर्ज करणे सुरू आहे. या ऑनलाइन प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतराची एक किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना एक ते पाच किलोमीटरपर्यंतच्या शाळा निवडण्याची संधी मिळणार आहे. अर्जात दुरुस्ती किंवा नवीन अर्ज करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, १२ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी पालकांना केवळ निवास स्थानापासून एक किलोमीटर अंतरातील शाळाच निवडण्याची मुभा होती. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाविरोधात पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत एक किलोमीटरची सक्ती योग्य नसल्याचे स्पष्ट केले. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध नसेल, तर त्या विद्यार्थ्याला अधिक अंतरावरील शाळेत प्रवेश घेण्यापासून रोखणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे शासनाने नियमांमध्ये सुधारणा करून पालकांना अधिक अंतरावरील शाळांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.
आता प्राधान्याने एक किलोमीटर, त्यानंतर तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अंतरातील शाळांचे पर्याय पालकांना निवडता येणार आहेत. तसेच १६ मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत, त्यांना अर्ज ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहे.
सोलापुरातून प्रवेशाच्या दुप्पट अर्ज
‘आरटीई’ प्रवेशात सोलापूर शहरातील १७ शाळा असून, त्या शाळांमध्ये २५७ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील २६९ शाळांमध्ये देखील सामान्य कुटुंबातील दोन हजार ६१५ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मुदतवाढीमुळे पुढील १० दिवसांत आणखी अर्ज वाढतील. प्रवेश क्षमतेच्या दुप्पट अर्ज असल्याने मोफत प्रवेशाची लॉटरी कोणाला लागणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
२५ मार्चपर्यंत करता येतील अर्ज
‘आरटीई’ प्रवेशाच्या नियमावलीत बदल करण्यात आला असून, आता पालकांना एक किमीऐवजी तीन किलोमीटर परिसरातील शाळेत त्यांच्या पाल्याचा प्रवेश घेता येणार आहे. पूर्वी भरलेल्या अर्जात दुरुस्ती करण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत आहे.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सोलापुरातील ‘आरटीई’ची स्थिती
एकूण शाळा
२८६
प्रवेश क्षमता
२,८७२
विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज
४,५७०
अर्जातील दुरुस्तीची मुदत
२५ मार्च
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.