राष्ट्रपतिपदक विजेत्यांचा मोफत प्रवास कागदावरच

प्रशांत घाडगे
सोमवार, 21 मे 2018

पुणे - ई-तिकिटिंगच्या उपकरणात नोंद नसल्यामुळे राष्ट्रपतिपदक विजेते एसटी महामंडळाच्या मोफत प्रवासाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सुविधेसाठी वर्षाला प्रतिव्यक्ती ११ हजार रुपये राज्य सरकार एसटी महामंडळाला देत आहे. तरीही राष्ट्रपतिपदक विजेत्यांना मोफत प्रवासापासून डावलले जात आहे. 

पुणे - ई-तिकिटिंगच्या उपकरणात नोंद नसल्यामुळे राष्ट्रपतिपदक विजेते एसटी महामंडळाच्या मोफत प्रवासाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सुविधेसाठी वर्षाला प्रतिव्यक्ती ११ हजार रुपये राज्य सरकार एसटी महामंडळाला देत आहे. तरीही राष्ट्रपतिपदक विजेत्यांना मोफत प्रवासापासून डावलले जात आहे. 

दिव्यांगांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल कामायनी संस्थेचे कालिदास सुपाते यांना २०१२ मध्ये राष्ट्रपतिपदक मिळाले आहे. राज्य सरकारने अध्यादेश काढून राष्ट्रपतिपदक विजेत्यांना मोफत एसटी प्रवासाची सवलत दिली आहे. त्यानुसार सुपाते प्रवास करण्यासाठी गेले असता, ई-तिकिटिंगच्या उपकरणात या सुविधेची नोंदच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी गेल्या महिन्यात एसटी महामंडळाकडे लेखी तक्रार केली; परंतु त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही. एसटी महामंडळाने सुपाते यांना विनामूल्य सवलत पास दिला आहे. मात्र, प्रवास करताना कोणतीही सवलत मिळत नाही. पुरस्कारप्राप्त प्रत्येक व्यक्तीमागे एसटी महामंडळाला राज्य शासनाकडून दरवर्षी अकरा हजार रुपये दिले जातात. तरीही राष्ट्रपतिपदक विजेते या सुविधेपासून वंचित राहत आहेत. 

याबाबत स्वारगेट आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले, की अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून येणाऱ्या निर्णयानुसार याबाबत कार्यवाही केली जाईल.

तीस वर्षांपासून प्रौढ मतिमंद मुलांसाठी काम करत आहे. शासनाच्या नियमानुसार पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. मात्र, त्याचा लाभ मिळत नाही. याबाबत एसटी महामंडळाशी पत्रव्यवहार करूनही दखल घेतली नाही. परिवहन मंडळाने ई-तिकिटिंग उपकरणातील तांत्रिक दोष दूर करून पुरस्करार्थींना न्याय द्यावा.
- कालिदास सुपाते, राष्ट्रपती पुरस्कार विजेते

ज्या व्यक्तींना पुरस्कार मिळाले आहेत, अशा व्यक्तींकडून वाहकांनी तिकीट घेऊ नये. याबाबत राज्यातील सर्व बस स्थानकांना लवकरात लवकर सूचना दिल्या जातील. तसेच ई-तिकिटिंगच्या उपकरणात आवश्‍यक ते तांत्रिक बदल केले जातील. 
- राजकुमार पाटील, महाव्यवस्थापक, वाहतूक, एसटी महामंडळ

Web Title: free st journey president award winner