प्रतिसरकार चळवळीतील शेवटचा दुवा निखळला; सोपानराव घोरपडे यांचे निधन

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 22 September 2020

सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संग्राम संघटनेचे ते अध्यक्ष होते. अनेक युवकांना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच आग्रही असत. त्यांच्या निधनाने प्रतिसरकारच्या चळवळीतील पश्‍चिम महाराष्ट्रातील शेवटचा दुवा निखळला आहे.
 

सातारा : भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतिसरकारमधील रहिमतपुर गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे उर्फ आप्पा (वय 101) यांचे आज (मंगळवार) पहाटे रहिमतपूर येथे निधन झाले. त्याचे मागे नातू राजू व कन्या असा परिवार आहे. घोरपडे यांच्या जाण्याने प्रतिसरकारच्या चळवळीतील सातारा जिल्ह्यातील अखेरचा दुवा निखळला आहे. 

सोपानराव घोरपडे हे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकार चळवळीत सक्रिय सहभागी होते. त्यांना स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेकदा कारावास भोगावा लागला होता. 1936 ते 1938 या कालावधीत त्यांनी विद्यार्थी संघटना स्थापन करून विद्यार्थ्यांमध्ये व जनतेमध्ये स्वातंत्र्याचे बीज रोवण्याचे काम केले. त्यांचे मुळगाव रहिमतपूर जवळील गोजेगाव. परंतु ते आजोळी म्हणजेच रहिमतपूर येथे राहात होते. रामगड कॉंग्रेस अधिवेशनातील ठराव जनतेमध्ये पोचविण्यासाठी त्यांनी जनजागृतीचा सपाटा लावला होता. खटाव तालुक्‍यातील पुसेगांव येथील सरकारी कचेरी जाळल्याप्रकरणी त्यांना त्याकाळी अटक झाली होती. प्रारंभीच्या काळात शेतकरी कामगार पक्ष आणि त्यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात सक्रिय काम केले. रहिमतपूर नगर परिषदेवर ते दोन वेळा निवडून आले होते.

सेनेचे मंत्री म्हणाले, कितीही आदळाआपट करा सरकार पडणार नाही

परंतु राजकारणापेक्षा समाजातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताच्या बाजूने त्यांनी भूमिका बजावली. सातारा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणीत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोलाचे योगदान दिले आहे. पाचगणी येथे महात्मा गांधीचे स्मारक व्हावे, म्हणून गेली सतरा वर्षे प्रयत्नशिल होते. तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रश्‍नावर ते जिल्हाभर सतत संपर्क करून प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्याचबरोबर चले जाव चळवळीचे सातारा येथे स्मारक होण्याबाबत ते नेहमीच आग्रही होते. त्यासाठी त्यांनी अनेकांना बरोबर घेऊन सरकार दप्तरी प्रयत्न केले होते. सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संग्राम संघटनेचे ते अध्यक्ष होते. अनेक युवकांना मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच आग्रही असत. त्यांच्या निधनाने प्रतिसरकारच्या चळवळीतील पश्‍चिम महाराष्ट्रातील शेवटचा दुवा निखळला आहे.

राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो; विकासाची वाट मोकळी 

आशालता वाबगावकर यांचा गायिका ते नायिका एक यशस्वी जीवनप्रवास 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Freedom Fighter Sopanrao Ghorpade Passes Away Satara Trending News