Friendship Day Special : मैत्रीचा धागा अन्‌ जगण्याला बळ...

Friendship-Day-Special
Friendship-Day-Special

मैत्रीचा धागा जुळला, की जगण्याला बळ मिळतं; त्याला नवा अर्थ, नवा आयाम मिळतो. एवढंच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर परिस्थितीला तोंड देत असताना त्यावर मात करणं सोपं होतं. त्याचीच काही उदाहरणं, त्यांच्याच शब्दांत...

भेदापलीकडे जपली मैत्री
धर्म, जात, वंश आणि परंपरा कधीही मैत्रीच्या आड येत नाही. तीच परंपरा कायम ठेवत मजहर कागदी आणि माझी मैत्री टिकली तर आहेच, ती वाढतही आहे. प्राथमिक शाळेपासून, म्हणजे १९६६ पासूनची मैत्री कायम आहे. पहिलीपासून शाळेत एकत्र होतो. दहावीपर्यंत शिवाजी हायस्कूलमध्ये शिकलो. आम्ही सगळ्या गोष्टी बरोबरीत केल्या आहेत. आजही त्या मैत्रीच्या खात्यात एकत्र आहोत. मजहरभाई मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मुस्लिम समाजाच्या सगळ्या परंपरा जपतातदेखील. वारकरी संप्रदायासह हिंदू समाजाच्या प्रथा, परंपरा मी जपतो. धर्म संकल्पना कायम आमच्यासोबत राहते. मात्र, खासगी आयुष्यात अत्यंत चांगला मित्र म्हणून मजहर मला नेहमीच जवळचा आहे आणि राहीलही. मध्यंतरी पारायण सोहळ्याचा सप्ताह घेतला होता. त्यात मजहर कागदी यांचा सत्कार केला.

चांगला मित्र, उत्तम नागरिक म्हणून तो नेहमीच जवळचा राहिला. आम्ही दोघेही एकमेकांच्या धर्माचा आदर राखून एकत्र असतो आणि राहतोही. धर्मामुळे आमच्या मैत्रीत कधीच अंतर पडलेलं नाही, पडणारही नाही. दरवर्षी रमजान ईदला मजहरच्या घरी जाऊन शुभेच्छा देतो, फलाहार करतो. दिवाळीत मजहरभाई आमच्या घरी येतात. शुभेच्छा देऊन फराळ करतात.

स्वप्नांना संविधान देतोय बळ
कृष्ण-सुदामाची गोष्ट बहुतांश सर्वांनीच वाचली, ऐकली असेल. आधुनिक काळातही आमची मैत्री अशीच काहीशी वेगळी आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही दोघं एकमेकांना खंबीर साथ देत वाटचाल करत आहोत. संविधानला संकेतची मनापासून साथ लाभल्याने स्वप्नं प्रत्यक्षात उतरवायला बळ मिळत आहे. संकेतशिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाही करू शकत नसल्याची भावना संविधानची आहे. केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेताना आम्हा दोघांमध्ये झालेली मैत्री वृद्धिंगत होत गेली. बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर संकेत सध्या एमपीएससी परीक्षांची तयारी करतोय. परंतु आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने, अधिकारी होण्याच्या त्याच्या या स्वप्नांना बळ देताना त्याच्या एसटी बसपासचा खर्च मी उचलतोय. विशेष म्हणजे उद्या (ता. ४) फ्रेंडशिप डेनिमित्त संकेतला एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तकांचा संच भेट देत मैत्रीचे नाते अधिकच घट्ट करण्याचे नियोजन करत आहे.

समानतेची शिकवण देणारी अतूट मैत्री
अभियांत्रिकीला शिकत असताना बालकांमधील कावीळ कमी करण्याचे यंत्र आम्ही तीन मित्रांनी विकसित केले. सोलापुरातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले आणि प्राध्यापकांच्या प्रेरणेतून हा प्रकल्प यशस्वी झाला अन्‌ शिक्षणही पूर्ण झाले. नोकरीपेक्षा उद्योजक होण्याचे आम्हा मित्रांचे स्वप्न पूर्ण झाले. अर्थसाहाय्यासाठी फिरत असताना इर्शाद सय्यद या उद्योजकाबद्दल माहिती मिळाली. मात्र, ते मोठे उद्योजक अन्‌ शंभरावर कामगारांचा लवाजमा, लाखोंची उलाढाल असल्याने निराशाच होईल, असा समज होता. परंतु आमची जिद्द, चिकाटी, मेहनत पाहून त्यांनी मैत्रीचा हात पुढे केला. ते मुस्लिम अन्‌ आम्ही लिंगायत व भावसार समाजाचे असतानाही आमच्याशी अतूट मैत्री केली. रमजान ईद, बकरी ईद असो, की आमच्या समाजातील सण-उत्सव असोत, आम्ही एकत्रित साजरे करतो. वडिलांच्या वयाचे असतानाही त्यांनी आम्हाला साथ देऊन आमचा उद्योग उभारण्यात योगदान तर दिलेच, त्याहूनही वेगळा असा सामाजिक समतेचा संदेशही दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com