गोवा महामार्गासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर - गडकरी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 एप्रिल 2017

मुंबई - मुंबई- गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले असून हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या एक टक्का रक्कम राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

केंद्र शासनाच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात गडकरी यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले की, मुंबई- गोवा हा महत्त्वपूर्ण महामार्ग जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 कि. मी. लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करून 2018 पर्यंत हे काम पूर्ण करावे तसेच जानेवारी 2019 मध्ये गोवा महामार्गाचे उद्‌घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी या वेळी दिले.

गोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू- वसई- अलिबाग- श्रीवर्धन- दाभोळ- गणपतीपुळे- रत्नागिरी- देवगड- मालवण ते वेंगुर्ला असा समुद्र किनाऱ्याशेजारून जाणारा महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया 31 मे 2017 पर्यंत पूर्ण करून कार्यादेश देण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबई- पुणे- सातारा- बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये साताराकडे जाणाऱ्या प्रस्तावित नवीन बोगद्याच्या आराखड्याचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले.

Web Title: fund for goa highway