esakal | बारावी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार; प्रतीक्षा सरकारच्या निर्णयाची

बोलून बातमी शोधा

null

बारावी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार; प्रतीक्षा सरकारच्या निर्णयाची

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आणि बारावीच्या परीक्षा होणार असे सांगण्यात आले. परंतु बारावीची परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार याबाबत राज्य सरकारने कोणतीही स्पष्टता अद्याप केलेले नाही. त्यामुळे बारावीच्या जवळपास  १३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १२ लाख ७३ हजारांहुन अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय १२ एप्रिल रोजी जाहीर होता. मात्र त्यानंतर राज्य सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षेबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय २० एप्रिल रोजी जाहीर केला. या निर्णयानुसार दहावीची परीक्षा रद्द केली, तर बारावीची परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारने १२ एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयात बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील, असे सांगतिले होते. मात्र, या परीक्षेबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र आता एप्रिल महिना संपत आला, असतानाही बारावीच्या परीक्षा कधी होणार, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा पद्धती याबाबत कोणतीही सूचना राज्य सरकार किंवा राज्य शिक्षण मंडळाकडून न आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकही संभ्रमात पडले आहेत.

हेही वाचा: बेड मिळेना म्हणून पुण्याच्या रुग्णाने रात्रीत गाठली सांगली

विद्यार्थ्यांचा वाढतोय ताण

परीक्षेबाबत ठोस निर्णय हाती येत नसल्याने विद्यार्थ्यांचा ताण दिवसागणिक वाढत असल्याचे निरीक्षण पालक आणि शिक्षक नोंदवित आहेत. सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यास, उजळणी अंतिम टप्प्यात आहे. असे असताना परीक्षेचे वेळापत्रक हाती असल्यास नियोजनबद्ध अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य राखण्यास मदत होते. पण आता आणखी कितीवेळ परीक्षेची वाट पाहायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे.

पुढील प्रवेश परीक्षांचा विचारात घेऊन निर्णय घ्यावा

‘‘बारावीचे वर्ष हे पुढील अभ्यासक्रमासाठी महत्त्वाचे असते. विद्यार्थी पारंपारिक पदवी अभ्यसक्रमाबरोबरच औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, विधी अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांची तयारी करत असतात. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या प्रवेश परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षेचे नियोजन वेळेत करणे गरजेचे आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढणार नाही, याचीही दक्षता घ्यायला हवी.’’

- डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय (शिवाजीनगर)

पुढील शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू व्हावे

गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. त्याचा परिणाम प्रवेश प्रक्रिया, प्रवेश परीक्षा, परीक्षा, निकाल अशा सगळ्यावरच झाला. त्यामुळे गेल्यावर्षी लांबलेले शैक्षणिक वर्ष (२०२०-२१) भरून काढून पुढील शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) वेळेत सुरू करण्याच्यादृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.

मागील वर्षी असे लांबले शैक्षणिक वर्ष (२०२०-२१)

अभ्यासक्रम : लांबलेले शैक्षणिक वर्ष (महिन्यांमध्ये)

अकरावी : सहा महिने

पदवी (प्रथम वर्ष) : दीड ते दोन महिने

पदव्युत्तर पदवी : तीन ते चार महिने