पालिका निवडणूकः मुंडे, दानवे, केसरकरांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नगराध्यक्षपद थेट लोकांमधून निवडण्याची सुधारणा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्ता एका पक्षाची आणि नगराध्यक्ष दुसऱयाच पक्षाचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबई : नोटाबंदीनंतरचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा कौल सोमवारी नगरपालिका निवडणूक निकालाच्यारुपाने जाहीर झाला.

दुपारी दोनपर्यंत येत असलेल्या निवडणूक निकालामध्ये भाजपने निमशहरी भागामध्ये प्रथमच मुसंडी मारल्याचे चित्र राज्यातील अनेक भागात दिसत असले, तरी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या अनुक्रमे भोकरदन आणि परळी नगरपालिकांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. 

दुपारपर्यंत जाहीर झालेल्या 68 नगरपालिकांपैकी 24 ठिकाणी भाजप आघाडीवर असून नऊ नगरपालिकांमध्ये शिवसेना बाजी मारण्याच्या अवस्थेत आहेत. काँग्रेसने 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 8 ठिकाणी सत्ता काबिज करण्याच्यादिशेने वाटचाल केली आहे. संपूर्ण राज्यातील चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल असे अपेक्षित आहे. 

नगराध्यक्षपद थेट लोकांमधून निवडण्याची सुधारणा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सत्ता एका पक्षाची आणि नगराध्यक्ष दुसऱयाच पक्षाचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

देशपातळीवर नोटाबंदीचा निर्णय आठ नोव्हेंबरला झाल्यानंतर राज्यातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती. नोटाबंदीचा नेमका परिणाम मतदारांच्या मानसिकतेवर किती झाला, याचा अंदाजही या निकालांतून येणे अपेक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या निवडणुकांकडे देशाचेही लक्ष आहे. 

अगदी सुरूवातीला जाहीर झालेल्या 18 नगरपंचायतींच्या मतमोजणीत मतदारांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या बाजूने कौल दिल्याचे चित्र आहे. गाव राजकारणात मागे असलेल्या भाजपने सकारात्मक सुरवात केल्याचे राज्याच्या काही भागात दिसते आहे. 

नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी रविवारी सुमारे 65 टक्के मतदान झाले होते. सार्वत्रिक निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत राज्यातील दिग्गजांचा कस लागला होता. सोमवारी झालेल्या मतमोजणीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे. 

परळीत पंकजा मुंडेंना शह देण्यात धनंजय मुंडेंना यश आले तर, सोलापूर जिल्ह्यातील दुधनीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेंना मोठा धक्का बसला. तेथे नगराध्यक्षपदी भाजपचा विजय झाला असून, पन्नास वर्षांनी काँग्रेसची सत्ता गेली आहे. कोकणात नारायण राणेंनी कमबॅक करत दीपक केसरकर यांना धक्का दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलने विजय मिळविला आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का देण्यात भाजपला यश आले आहे तर, इ्स्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना पॅकअप करावे लागले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना धक्का बसला आहे. साताऱयामध्ये राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे यांचा पराभव झाला असून तेथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांना यश मिळाले आहे. 

काही ठिकाणी हाणामारीच्या घटना वगळता संपूर्ण राज्यात शांततेने मतदान पार पडले होते. 

कोण काय म्हणालेः
भाजपः
रावसाहेब दानवेः
आमचे मुख्यमंत्री यशस्वीपणे काम करत आहेत. पूर्वीपेक्षा आमची ताकद कितीतरी पटीने वाढली आहे. हे यश फडणवीस किंवा दानवेंचे नाही; भारतीय जनता पक्षाचे आहे. राज्यात 247 नगरसेवक आणि 23 नगराध्यक्षांसह भाजप नंबर वन बनला आहे. 
पंकजा मुंडेः परळीतील पराभवाची जबाबदारी मी स्विकारत आहे. मी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी आम्हाला यश मिळाले आहे. 
राष्ट्रवादीः 
धनंयज मुंडेः
मतदारांनी धनशक्तीला विरोध केला आहे. परळीमध्ये भाजपने धनशक्ती वापरली. राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वांना एकत्र आणले. मात्र, मतदारांनी आम्हाला कौल दिला आहे.
काँग्रेसः
पृथ्वीराज चव्हाणः
भाजपला नोटाबंदीच्या निर्णयाचा कुठेही फायदा झालेला दिसत नाही. या निवडणुकीत मतदारांनी एमआयएमसारख्या जातीयवादी पक्षांना साफ नाकारले आहे. हे दोन मुद्दे मला महत्वाचे वाटतात. 
नारायण राणेः काँग्रेस-राष्ट्रवादीने या राज्यात एकत्र निवडणुका लढवाव्यात. मागे झालेली घोडचूक सुधारावी, असे मला वाटते. आम्ही एकत्र राहिलो, तर राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ, हे नगरपालिका निकालांतून दिसते.

Web Title: Gains for BJP in rural Maharashtra after demoetisation; set back for Danve, Pankaja