
Gajanan Maharaj Prakat Din : टिळकांनी मंडालेत लिहिलेल्या गीतारहस्याची आधीच केली होती भविष्यवाणी!
Gajanan Maharaj Prakat Din : विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे गजानन महाराज यांचा आज १४५ वा प्रकटदिन आहे. महाराज अत्यंत परमोच्च स्थितीली पोहचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते. त्यांचे जीवन मोठे गुढच होते. त्यांच्या भक्तांवर त्यांचे अखंड कृपाछत्र होते असे त्यांच्या भक्तांची श्रध्दा आहे. अक्कल कोटचे स्वामी समर्थ यांच्या समाधी काळाच्या थोड्या अलिकडच्या काळातच गजानन महाराज प्रकट झाले होते असे सांगितले जाते.
महाराजांचं पहिलं दर्शन
श्री गजानन महाराज हे वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात शेगाव येथे १३ फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः ऐन तारुण्यात शेगावी दिसले. त्यावेळी श्रीगजानन महाराज, तेथील साधू देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर पडलेल्या उष्ट्या पत्रावळीतील कण वेचून खात होते. गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिऊन ते निघून गेले. पुढे ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचे शेगावी महादेवाच्या मंदिरात कीर्तन झाले. त्या वेळी टाकळीकर महाराजांच्या बेफाम असलेल्या घोड्याच्या चौपायांत श्री गजानन महाराज हे ब्रह्मानंदीनि मग्न होऊन निजलेले आढळले.
तो द्वाड घोडा शांत होऊन स्वस्थ उभा राहिला होता. कीर्तन संपल्यानंतर गोविंद महाराज मंदिरात झोपले, परंतु त्यांचे लक्ष त्या घोड्यावर होते. रोज दांडगाई करणारा घोडा आज स्वस्थ उभा कसा ? या गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी उठून निरखून पाहिले तेव्हा गजानन महाराजांनी घोड्याच्या चौपायी शयन केलेले दिसले. दुसऱ्या दिवशी कीर्तनात टाकळीकर महाराजांनी सांगितले की, ”हा साक्षात शिव अवतार आहे.
गितारहस्यची भविष्यवाणी
लोकमान्य टिळक यांनी गजानन महाराजांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीनिमित्त झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य टिळकांना कैद झाली, त्यावेळी महाराजांनी त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की, टिळकांना शिक्षा अटळ आहे. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार, ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. अशी माहिती सांगितली जाते.