केवळ "या' कारणामुळे एक्‍स्पोर्टर बनले मजूर! परिणामी चीन बांगलादेशाचा घेतो तसा "या' शहराचा फायदा घेतात "ही' राज्ये 

श्रीनिवास दुध्याल 
Wednesday, 5 August 2020

केवळ विमानतळ नसल्यामुळे व रेल्वेचा प्रवास टाळण्यासाठी विदेशीच नव्हे तर देशातील खरेदीदार सोलापूरला येण्यास टाळतात. त्यामुळे एक्‍स्पोर्ट दर्जाची उत्पादने घेऊनही सोलापुरातील गारमेंट उत्पादकांना जॉबवर्कर म्हणून कामे करावी लागत आहेत. परिणामी मुंबई, पुणे, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद या विमानतळ असलेल्या शहरातील गारमेंट उत्पादकांना एक्‍स्पोर्टर होता आले. या एक्‍स्पोर्टरकडून सोलापुरातील गारमेंट उत्पादकांना ठेकेदारांमार्फत कामे मिळतात, तीही कमी दरात. एक्‍स्पोर्ट व मार्केटिंगचे ज्ञान नसलेले, कधी स्वत:च्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी सोलापूर सोडून बाहेर न पडलेले उत्पादक कमी दरात का होईना आयते बसल्या ठिकाणी काम मिळत असल्याने उत्पादक म्हणून नव्हे तर मजूर म्हणून काम करण्यात धन्यता मानत आहेत.

सोलापूर : मृगाला कस्तुरीचा गंध नसतो... ही म्हण बहुतेकांनी ऐकली असेल. ही म्हण सोलापुरातील गारमेंट उत्पादकांना तंतोतंत लागू होतेय... त्यांच्यामध्ये इतके कौशल्य आहे, की त्यांची उत्पादने देश-विदेशात विकली जातात, मात्र त्यांनाच याची माहिती नसते. कारण, दुसऱ्याच उत्पादकांकडून त्यांची उत्पादने भलत्याच लेबलने देश-विदेशात विकली जातात. दुसऱ्याच्या कौशल्याचा उपयोग स्वत:च्या उत्पादनांसाठी करून घेणारे आज भरपूर उद्योजक आहेत. मात्र सोलापूरचे गारमेंट उत्पादक स्वत:च्या कौशल्याच्या मार्केटिंगचा कधी विचार न केल्याने आज शहरातील असंघटित राहिलेल्या गारमेंट उत्पादकांना मजुरी बेसवर एक्‍स्पोर्ट दर्जाची उत्पादने करावी लागत आहेत. 

हेही वाचा : ब्रेकिंग! कोरोना ड्यूटी करून गेलेल्या डॉक्‍टरची आत्महत्या; डिप्रेशनच्या गोळ्या खात होता 

विमानतळ नसल्याने मजूर म्हणून काम करण्यात मानताहेत धन्यता 
केवळ विमानतळ नसल्यामुळे व रेल्वेचा प्रवास टाळण्यासाठी विदेशीच नव्हे तर देशातील खरेदीदार सोलापूरला येण्यास टाळतात. त्यामुळे एक्‍स्पोर्ट दर्जाची उत्पादने घेऊनही सोलापुरातील गारमेंट उत्पादकांना जॉबवर्कर म्हणून कामे करावी लागत आहेत. परिणामी मुंबई, पुणे, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद या विमानतळ असलेल्या शहरातील गारमेंट उत्पादकांना एक्‍स्पोर्टर होता आले. या एक्‍स्पोर्टरकडून सोलापुरातील गारमेंट उत्पादकांना ठेकेदारांमार्फत कामे मिळतात, तीही कमी दरात. एक्‍स्पोर्ट व मार्केटिंगचे ज्ञान नसलेले, कधी स्वत:च्या उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी सोलापूर सोडून बाहेर न पडलेले उत्पादक कमी दरात का होईना आयते बसल्या ठिकाणी काम मिळत असल्याने उत्पादक म्हणून नव्हे तर मजूर म्हणून काम करण्यात धन्यता मानत आहेत. 

हेही वाचा : मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाला दिली श्रीकांतने झळाळी; पटकावला यूपीएससीत देशात 231 वा क्रमांक! 

शहरात घरोघरी व छोट्या-मोठ्या हजारो कारखान्यांमध्ये गारमेंटची कामे होत आहेत, ज्यांची नेमकी संख्या कोणाकडे नाही व त्यांची संघटनाच नाही. श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघात केवळ 250 च्या आसपास उत्पादक सदस्य आहेत. या संघाने चार वर्षे सलग आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवून युनिफॉर्म हबच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केला. त्याला काही अंशी यशही आले. मात्र पुढे विमानतळ नसल्यामुळेच खरेदीदार सोलापूरला येण्यास धजावत नाहीत, असे दिसून आले. मात्र तरीही गारमेंट असोसिएशनमध्ये पाच ते सहा एक्‍स्पोर्टर आहेत, जे त्यांच्या मार्केटिंग टेक्‍निकमुळे विदेशात थोड्याफार प्रमाणात उत्पादने निर्यात करतात. 

या देशांना निर्यात होतात सोलापुरातील उत्पादने 
आजही असंघटित गारमेंट उत्पादकांनी तयार केलेले सर्व प्रकारचे स्कूल व कॉर्पोरेट युनिफॉर्म, फाईव्ह स्टार हॉटेलसाठी लागणारे कर्टन्स, बेडशीट, टेबल क्‍लॉथ यासह फॅन्सी कपड्यांची निर्यात दुबई, यूएसए, अरब अमिरात, अबुदाबी, ऑस्ट्रेलिया आदी विविध देशांत होते. मात्र याचा फायदा मर्चंट एक्‍स्पोर्टर व इतर राज्यांतील उत्पादकांना होतो. चीन ज्याप्रमाणे बांगलादेशातून स्वस्तात गारमेंट उत्पादने तयार करून एक्‍स्पोर्ट करतो, त्याचाच कित्ता भारतातील काही राज्यांनी गिरवला आहे. सोलापुरातून स्वस्तात गारमेंट उत्पादने तयार करून विदेशात एक्‍स्पोर्ट केली जात आहेत. 

येथील गारमेंट उत्पादक वीरेंद्र पद्मा म्हणतात, शहरात गारमेंट उद्योगातील कुशल कामगारांमुळे व वाढत्या गारमेंट उद्योगामुळे येथे गारमेंट उद्योगाचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये येथील युनिफॉर्मची उत्पादने जात आहेत. एवढेच नव्हे तर गारमेंट उत्पादने विदेशातही निर्यात होत आहेत. मात्र त्याचा फायदा सोलापुरातील उत्पादकांना न होता मर्चंट एक्‍स्पोर्टर्स, ठेकेदार व इतर राज्यांतील उत्पादकांना होत आहे. कारण, एक्‍स्पोर्ट होणारी युनिफॉर्म उत्पादने सोलापुरातून जरी तयार होत असली तरी त्यांचे मालक इतर राज्यांतील उत्पादक आहेत. कारण, ते सोलापुरातील कारागिरांकडून स्वस्तात उत्पादने तयार करून घेतात व त्यांचे लेबल लावून एक्‍स्पोर्ट करतात. परिणामी जॉबवर्कवर समाधानी मानून एक्‍स्पोर्ट क्वालिटी उत्पादने देणाऱ्या सोलापुरातील उत्पादकांना मार्केटिंगचे ज्ञान नसल्याने व सोलापूरला विमानतळ नसल्याचा फायदा इतर राज्यांना होत आहे. 

श्री. पद्मा म्हणतात, मी एकच उदाहरण देतो, त्यावरून लक्षात येईल, की सोलापूरच्या उत्पादकांचा कसा गैरफायदा घेतला जातो. मोदी जॅकेट कापड, कॅन्व्हास व शिलाईसह 480 रुपयांपर्यंत तयार होते. कामगाराला सोलापुरातील कामगाराला जॅकेट शिलाईचे केवळ 20 रुपये मिळतात. मात्र हेच जॅकेट मोठ्या शहरांतील शोरूममध्ये दुसऱ्या उत्पादकांचे लेबल लावून अडीच हजार ते 2700 रुपयांपर्यंत विकले जाते. मात्र जॅकेटची निर्मिती करणाऱ्याला केवळ 20 रुपयांवर समाधान मानावे लागते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garment manufacturers became Laborers in Solapur because there was no airport