मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाला दिली श्रीकांतने झळाळी; पटकावला यूपीएससीत देशात 231 वा क्रमांक 

हुकूम मुलाणी 
Tuesday, 4 August 2020

बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर श्रीकांतने निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत झालेली निवड सोडून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे एक वर्ष तयारी केली. त्यानंतर दिल्लीत सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत देशात 33 वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला.

मंगळवेढा (सोलापूर) : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 231 व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या वडिलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च केले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत अखेर मुलाने कलेक्‍टर होण्याचे ध्येय पूर्ण केले. 

हेही वाचा : मोठी ब्रेकिंग! पोलिस पाटलांना पाच महिन्यांपासून मानधनच नाही 

दुष्काळी तालुक्‍याच्या दक्षिण भागात असलेल्या बावची गावात जिरायत शेतीत केलेला खर्च परवडत नसल्याने मोलमजुरी करून जगणाऱ्या बावची गावातील कुंडलिक खांडेकर यांनी स्वत: अशिक्षित असूनही आपल्या तीन मुलांना शिक्षित केले. थोरल्या मुलाने मार्केटिंगच्या माध्यमातून रोजगार मिळवला आणि दुसरा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. तिसऱ्या मुलाचे पदवीचे शिक्षण सुरू आहे. बावचीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षण झाल्यानंतर श्रीकांतने निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शिक्षण झाल्यानंतर दापोलीच्या कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आयआयटीत झालेली निवड सोडून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची पुणे येथे एक वर्ष तयारी केली. त्यानंतर दिल्लीत सहा महिन्यांपासून तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात वनसेवा परीक्षेत देशात 33 वा क्रमांक व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला. दहावीपर्यंत मराठी माध्यमानंतर अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. सुरवातीला इंग्रजी विषयाशी संघर्ष करावा लागला; पण परिस्थितीची आईवडिलांनी जाणीव करून दिली नसल्याने लोकसेवा आयोगात चांगले करिअर करता आले. 

हेही वाचा : पुण्याच्या पावसावर सोलापूरच्या "उजनी'ची मदार 

या यशाबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाला, शहरी भागातील मुलांच्या परिस्थितीशी तुलना न करता आपले ध्येय समोर ठेवून तयारी केल्यास यश मिळू शकते. आज लोकसेवा परीक्षेचा निकाल जाहीर होताच बावची गावावर आनंदाचे वातावरण पसरले असून, वडील आजारी असल्यामुळे एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेले. स्वतःजवळ मोबाईल नसल्यामुळे दवाखान्यात फोन करून मुलगा कलेक्‍टर झाल्याचे नातेवाइकांनी कळवले. तर आई शेतातच कष्ट करत असल्याची आढळून आली. 

मुलाच्या यशाबद्दल आई कमल खांडेकर म्हणाली, मुलाच्या यशाने आमचे कुटुंब सुखी झाले. अजूनही कष्ट करत असून, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज आजही भरतोय. कष्ट करतोय. कुणाशी लबाडी केली नसल्याने मुलाने सार्थकी लावले. परीक्षेतील यशाप्रमाणे प्रशासनातील कामात देखील त्याने आपला ठसा उमटवावा. गोरगरिबांची सेवा करावी, एवढीच अपेक्षा आहे. 
 
श्रीकांत म्हणाला, आईवडिलांना मुलगा यशस्वी होईल असे वाटले नव्हते. पण मी ज्या धैर्याने अभ्यास केला त्याची पूर्ती झाली. खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी असताना देखील ज्या कष्टकरी कुटुंबातून इथून पुढे आलो, त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीत ज्या वेदना आहेत, त्यांच्या हितासाठी भारतीय प्रशासन सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातून मिळालेल्या संधीतून त्यांच्यासाठी काम करण्याचा माझा मानस आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UPSC result 2019 Shrikant Khandekar success story