तोट्यातील एसटीला "शिवशाही'चा आधार 

ब्रह्मा चट्टे
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई - एसटी महामंडळाच्या वातानुकूलित "शिवशाही' बसला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळी सुटीत अनेकांनी "शिवशाही'च्या प्रवासाला पसंती दिल्याने एसटीच्या महसुलात वाढ होत असून, तोट्यातील एसटीला "शिवशाही'चा आधार मिळाला आहे. 

मुंबई - एसटी महामंडळाच्या वातानुकूलित "शिवशाही' बसला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळी सुटीत अनेकांनी "शिवशाही'च्या प्रवासाला पसंती दिल्याने एसटीच्या महसुलात वाढ होत असून, तोट्यातील एसटीला "शिवशाही'चा आधार मिळाला आहे. 

महामंडळाचा आतापर्यंत दोन हजार 300 कोटी रुपये संचित तोटा आहे. तो कमी करण्यासाठी महामंडळाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून महामंडळाने वातानुकूलित "शिवशाही' बसची सुरवात केली. राज्यात अशा दोन हजार बस एसटीच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. आजपर्यंत 838 "शिवशाही' बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत. या बस चालवण्यासाठी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. गाडीचे भाडे, डिझेलचा खर्च व वाहकाचा पगार महामंडळाला द्यावा लागतो. "शिवशाही' बसना सरासरी किमान 35 रुपये प्रतिकिलोमीटर दराने उत्पन्न मिळाले तरच त्या परवडतात. सध्या "शिवशाही'चे सरासरी उत्पन्न 42 रुपये प्रतिकिलोमीटर एवढे आहे. महामंडळाचे सध्याचे सरासरी उत्पन्न 30 रुपये प्रतिकिलोमीटर आहे. ते किमान 35 रुपये प्रतिकिलोमीटर असणे आवश्‍यक आहे. महामंडळाचे दैनंदिन उत्पन्न 19 कोटी रुपये आहे. त्यापैकी "शिवशाही' बस सध्या दीड कोटी रुपये उत्पन्न मिळवून देत आहे. 

- 9 जून 2017 - मुंबई-रत्नागिरी मार्गावर पहिली "शिवशाही'. 
- 4 एप्रिल 2017 - मुंबई-शहादा मार्गावर पहिली शयनयान "शिवशाही' धावली. 
- सध्या राज्यातील 276 मार्गांवर "शिवशाही'. 
- "शिवशाही'चे सरासरी भारमान 65 टक्के; जे सर्वाधिक आहे. 

सर्वाधिक प्रतिकिलोमीटर महसूल देणारे "शिवशाही'चे मार्ग 
- पुणे-महाबळेश्‍वर - 52 
- बीड- पुणे - 53 
- नांदेड- पिंपरी-चिंचवड - 54 
- मुंबई- त्र्यंबकेश्‍वर - 55 
- मुंबई- अलिबाग - 56 
- मुंबई- महाड - 57 
- कुर्ला- जुन्नर - 60 
- स्वारगेट- अलिबाग - 62 
- धुळे- नाशिक - 62 
- दापोली- पिंपरी-चिंचवड - 64 
(आकडे रुपयांत) 

Web Title: Getting huge response from passengers seated sivasahi