पाणी द्या, नाही तर वेगळे राज्य करा! 

पाणी द्या, नाही तर वेगळे राज्य करा! 

मुंबई - संयुक्‍त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्या राजकीय कात्रीत मराठवाडा अकारण होरपळत असल्याने तेलंगणच्या धर्तीवर मराठवाडा वेगळे राज्य करा, असा संतापाचा सूर मराठवाड्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत उमटल्याची माहिती समोर आली आहे. 

शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी आज पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेत या बैठकीतल्या आमदारांच्या तीव्र भावना कळवल्या. मराठवाड्यात भीषण दुष्काळाचे दुष्टचक्र थांबत नाही. यंदा या दुष्काळाची दाहकता अत्यंत जीवघेणी होण्याचे संकेत आहेत. मात्र सततच्या दुष्काळानंतरही मराठवाड्याला साधे पिण्याचे पाणी मिळत नाही, समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र पाळले जात नाही. विकासकामांच्या निधीसह हक्‍काचे पाणीही पळवले जात असल्याने यंदा मराठवाड्यातील नागरिकांचा संताप अनावर होण्याची शक्‍यता असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख यांना भेटून या भावना कानावर घालण्यासाठी शिवसेना आमदार एकत्र येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मराठवाड्याचा अनुषेश आजही शिल्लक आहे. या अगोदर पश्‍चिम महाराष्ट्राने मराठवाड्याचा निधी वळवला, तर आता विदर्भाच्या विकासासाठी मराठवाडा वंचित ठेवला जात असल्याची आमदारांची भावना आहे. पाणी नाही, उद्योग नाहीत, रोजगार नाहीत; त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास नाही. स्थलांतर आणि आत्महत्या या भीषण दुष्टचक्रात मराठवाडा अडकला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातल्या नदी खोऱ्यांतून पाणी वळवणे व उत्तर महाराष्ट्रातून गोदावरीत येणारे हक्‍काचे पाणी मिळवण्यात आजही मराठवाडा वंचित असल्याचे हेमंत पाटील म्हणाले. 

तेलंगण राज्याच्या निर्मितीनंतर तेथे विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्यांना हक्‍काचे पाणी मिळाले आहे. त्याच धर्तीवर मराठवाडाही वेगळा करण्याची मागणी जोर धरू शकते, अशी धास्ती आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com